इस्लामाबाद – पाकिस्तानी सैन्याच्या चिथावणीमुळे पुरातन मूर्तीची तोडफोड करण्यात आल्यामुळे पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या सरकारवर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. वायव्येकडील खैबर पख्तुनवा प्रांतात मर्दान भागातील तख्तभाई परिसरातल्या एका बांधकामासाठीच्या उत्खननादरम्यान ही पुरातन बुद्ध मूर्ती सापडली होती. मात्र, ही मूर्ती घणाचे घाव घालून छिन्नविछिन्न करण्यात आल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ही मूर्ती जमिनीतून पूर्णपणे बाहेरही घालण्यात आलेली नव्हती. तेव्हा आजूबाजूचे लोक केवळ बघ्याच्या भूमिकेत ही तोडफोड बघत उभे राहिलेले होते. तर काहीजण या विध्वंसाचे चित्रीकरण करत उभे राहिले होते. पुरातन बुद्ध मूर्तीचा अशाप्रकारे विध्वंस म्हणजे “गुन्हा’ असल्याचे मत खैबर पख्तुनवा प्रांताचे पुरातत्व आणि संग्रहालय विभागाचे संचालक डॉ. अब्दुल समाद यांनी म्हटले आहे. “कोणत्याही धर्माबद्दलची तीव्र असहिष्णूता सहन न करता येण्यासारखी बाब आहे.’ असेही ते म्हणाले आहेत.
विध्वंस करण्यात आलेली बुद्ध मूर्ती गंधार काळातील म्हणजे अंदाजे 1700 वर्षे जुनी असावी.
पाकिस्तानातील असहिण्षूतेची अनेक उदाहरणे यापूर्वीही प्रसिद्ध झाली आहेत. नव्याने बांधण्यात येणाऱ्या हिंदू मंदिरावरही खूप टीका झाली आहे. पाकिस्तानातील कट्टरता वाढवण्याचे काम पाकिस्तानच्या सैन्याकडूनच मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक किंवा उदारमतवादी धोरणाच्या नागरिकांचा आवाज दाबला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.