Pune District : खेडमधील प्रश्न अधिवेशात उपस्थित

राजगुरूनगर : खेड तालुक्याच्या पूर्व, पश्चिम भागातील पाणी प्रश्न, चाकण वाहतूक कोंडी आणि चाकण एमआयडीसी रस्त्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभा अधिवेशनात खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे यांनी आवाज उठवला.
खेडचे नवनिर्वाचीत आमदार बाबाजी काळे यांनी पहिल्याच अधिवेशनात तालुक्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रहाची भूमिका घेतली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पाणीप्रश्न आणि पर्यटनाबाबत त्यांनी मुद्दे उपस्थित केले. यात धारणांतर्गत बुडीत बंधारे बांधण्याच्या प्रश्नाला वाचा फोडली.
उन्ह्याळ्यात चासकमान धरणाचे पाणी खाली गेले की या भागात पिण्याच्या पाण्याची दरवर्षी मोठीटंचाई निर्माण होते. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बुडीत बंधारे बांधण्यासाठी गेली अनेक वर्षे या भागातील नागरिकांचा लढा सुरू आहे. आमदार काळे यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडल्याने आदिवासी भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
आमदार काळे यांनी तालुक्यातील पूर्व भागातील पूर, चिंचबाईवाडी, गुळाणी, वाकळवाडी, कनेरसर वाफगाव, जरेवाडी गोसासी आदी गावांना पिण्याच्या पाण्याची योजना कळमोडी, चासकमान धरणातून करावी कळमोडी धरणाची उंची वाढवण्याची मागणी केली.





