Pimpri | थंडी वाढल्याने उबदार कपड्यांना मागणी

पिंपरी ,- शहरात वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली असून कपड्यांच्या दुकानात व रस्त्यावरील स्टॉलवर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्राहक स्वेटर, मफलर, जर्किन, कानटोपी यासारख्या उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी पिंपरीत नागरिकांची गर्दी होत आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडी सुरुवातीपासूनच अधिक जाणवू लागली आहे. थंडीची चाहूल लागताच पिंपरीतील मार्केट तसेच गोकुळ हॉटले ते पिंपरी चौक आणि जुना पुणे-मंबई महामार्गवर मोठ्या प्रमाणावर दुकाने थाटली आहेत. तसेच याठिकाणी उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. लहान मुलांपासुन ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी आवश्यक असलेले उबदार कपडे या ठिकाणी उपलब्ध झाले आहेत. महिलांसाठी स्वेटर व जॅकेटमध्ये कॉलर, हाफ बाह्यांचे, काश्मिरी, जॅकेट, जिफर उपलब्ध आहेत. टोपीमध्ये फेदर, वुलन, लाईकरा, फर कॅप असे विविध प्रकार आहेत. सध्या स्वेट शर्ट, विंटर कोट, कॉटन जॅकेट्स, कानपट्टी या प्रकारांना तरुणाईची मोठी मागणी आहे. लहान मुलांसाठी हुडी, कार्टूनचे चित्र असलेले, चेन असलेल्या स्वेटरला यंदा जास्त मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रंगीबेरंगी स्टोल्सला अधिक पसंती
दुचाकी चालवताना किंवा थंडीत चेहऱ्याला कोरडी आणि धुळी पासून बचावासाठी मुली स्टोलचा वापर करतात. सिल्क स्टोल सूट सलवार, जिन्स अशा सर्व वेशभूषांत तरुणींना वेगळाच लूक देतात. बाजारात हे स्टोल १०० रुपयांपासून उपलब्ध आहेत. ड्रेसला मॅचिंग किंवा आपल्या आवडीच्या रंगाच्या स्टोलचा वापर करुन आपल्या ड्रेसची शोभा वाढवण्यासाठी मुलींकडून नवनवीन स्टोल्सच्या खरेदीला पसंती मिळत आहेत.
उबदार कपड्यांच्या किमती-
लोकरी स्वेटर ४५० ते १०००
फॅन्सी लेडीज स्वेटर १००० ते ४०००
पुरुषांचे स्वेटर २००० ते ४०००
जॅकेट ७५० ते २०००
हातमोजे ४० ते ६०
कानटोपी ५० ते ८०
लहान मुलांचे स्वेटर ३५० ते ६५०





