भारतातून कपडे-चप्पल ब्रिटनला, तिथून व्हिस्की-कार भारतात! मोदींच्या दौऱ्यात होणार मोठा व्यापार करार

नवी दिल्ली/ लंडन – भारत आणि ब्रिटन दरम्यान मुक्त व्यापार करार बोलणी यशस्वी झाली असून कराराचा मसुदा तयार झाला आहे. 24 जुलै रोजी लंडन येथे दोन्ही देशाचे वाणिज्य मंत्री या करारावर स्वाक्षरी करणे अपेक्षित आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
भारत आणि ब्रिटनच्या वाणिज्य मंत्रालयादरम्यान या विषयावर अनेक आठवड्यापासून चर्चा चालू होती. ही चर्चा सहा मे रोजी यशस्वीरित्या संपुष्टात आली. त्यानंतर या कराराचा मसुदा तयार करण्याचे काम चालू होते. 2030 पर्यंत भारत आणि ब्रिटन दरम्यानचा व्यापार दुपटीने वाढवून 120 अब्ज डॉलरचा करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यासाठी या करारातील तरतुदीचा उपयोग होणार आहे.
करारातील तरतुदीनुसार ब्रिटन भारताच्या अधिक मनुष्यबळ लागणार्या वस्तूवर आयात शुल्क लावणार नाही. त्यामध्ये कातड्याच्या वस्तू, पादत्राने, कपडे इत्यादीचा समावेश आहे. या बदल्यात भारत- ब्रिटनमधील व्हिस्की आणि कार विनाश शुल्क किंवा कमी शुल्कावर आयात करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारपासून ब्रिटन आणि मालदीवच्या चार दिवसाच्या दौर्यावर जात आहेत. या दोन्ही देशाबरोबर व्यापार वाढावा यासाठी प्रयत्नाचा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. मोदी यांच्या सोबत वाणिज्य मंत्री पियुष गोयल जाणार आहेत. प्रदीर्घ काळ प्रयत्न करून हा करार यशस्वी केला आहे. फक्त ब्रिटनबरोबरच नाही तर अनेक देशाबरोबर पियुष गोयल यांची बोलणी चालू असून हे करारही लवकरच मूर्त स्वरूपात येतील असे समजले जात आहे.
अंमलबजावणी शक्य तितक्या लवकर
कराराच्या मसुद्यावर दोन्ही देशाच्या वाणिज्य मंत्र्याची स्वाक्षरी झाल्यानंतर कागदपत्रांची देवाणघेवाण होईल. त्यानंतर या कराराची अंमलबजावणी होण्याअगोदर भारताचे मंत्रिमंडळ आणि ब्रिटनची संसद यावर शिक्कामोर्तब करणे अपेक्षित आहे. भारताचे मंत्रिमंडळ यावर लवकरच शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. तशीच अपेक्षा ब्रिटिश संसदेकडूनही व्यक्त करण्यात येत आहे.
अंमलबजावणीचा तपशील पूर्ण झाल्यानंतर लगेच या कराराची अंमलबजावणी होऊ शकेल. यासाठी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असे समजले जाते. एकदा अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर मात्र दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार निर्धोकपणे वाढणार असल्याचे समजले जाते.





