Tukaram Mundhe | प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर महानगरपालिकेचा पदभार असताना त्यांनी कोरोना काळात नियमबाह्य पद्धतीने काम केल्याचा आरोप भाजप आमदाराने केला. मुंढे यांनी स्मार्ट सिटीचा कार्यभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि महिला अधिकाऱ्यांशी चुकीचा व्यवहार केल्याचे म्हणत भारतीय जनता पार्टीचे आमदार कृष्णा खोपडे यांनी कारवाईची मागणी केली आहे. त्यांचं तातडीने सेवेतून निलंबन केलं पाहिजे, अशी मागणी खोपडे यांनी केली. यानंतर आता कृष्णा खोपडे यांना तुकाराम मुंढे यांच्या नावाने धमक्या दिल्या जात असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी खोपडे यांनी नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावही त्यांनी लिहून दिलं आहे. तुम्ही तुकाराम मुंढेंविरुद्ध का बोलत आहात? त्यांच्या निलंबनाची मागणी तुम्ही का करत आहात? असे प्रश्न विचारत संबंधित फोनवरील व्यक्तीने आमदार खोपडे यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. Tukaram Mundhe | मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा अध्यक्ष कार्यालय याशिवाय कृष्णा खोपडे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये धमकीच्या कॉलसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर मला पाहून घेण्याची धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले, ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. Tukaram Mundhe | कृष्णा खोपडे यांचे आरोप काय? तुकाराम मुंढे हे कोरोना काळात नागपूर महानगरपालिकेत रुजू झाल्यानंतर सात महिन्याच्या कार्यकाळात त्यांनी गैरप्रकार केले आहेत, असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला. त्यांच्याकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद नसतानाही त्यांनी नियमबाह्य पद्धतीने एका कंत्राटदाराला २० कोटी रुपयांचा धनादेश दिला होता. या प्रकरणात त्यांची चौकशी करून त्यांना अटक करा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली. याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पात महिला अधिकारी होत्या. तुकाराम मुंढे यांनी त्या महिला अधिकाऱ्यांचा छळ केला. महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं की एखाद्या आयएएस अधिकाऱ्याविरुद्ध दोन महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. कोरोना काळात उद्धव ठाकरे यांचे सरकार होते आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या दबावाखाली काही होऊ शकले नाही, असेही कृष्णा खोपडे यांनी सांगितले. हेही वाचा: PMC News: अनधिकृत फ्लेक्सवर आता १५ हजार रुपये दंड; महापालिका आयुक्तांनी दिले आदेश