सातारा – ट्विंकल व नंतर सिट्रस असे नाव केलेल्या कंपनीकडून सातारा जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांची फसवणूक झाली आहे. यामध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल आहेत. मात्र यातील चेन मार्केटिंग करणारे लीडर खुलेआम फिरत असून त्यांच्यावर कारवाई करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीच्या माध्यमातून ठेवीदार व एजंट महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे केली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण, महिला आंदोलनाच्या मनिषा पाटील तसेच ट्विंकलमध्ये फसलेल्या ठेवीदार महिला व महिला एजंट यांनी सातपुते यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ट्विंकल ही मुंबईतील गोयंका या उद्योगपतीने स्थापन केलेली कंपनी होती. यामध्ये एजंट नेमून व जादा व्याजदराचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील ठेवीदारांकडून ठेवी गोळा केल्या. जिल्ह्यातील टीम लिडर्संनी एजंटांना कमिशनचे व ठेवीदारांना जादा पैसा मिळण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपये या कंपनीच्या हॉलिडे स्कीमच्या नावाखाली कंपनीत गुंतवले. कालांतराने या कंपनीचे नाव बदलून सिट्रस करण्यात आले.
बॉंबे रेस्टॉरंट चौकात या कंपनीचे कार्यालय होते. याठिकाणी जिल्ह्यातील एजंटांनी ठेवीदारांच्या रकमा भरल्या आहेत. गेल्या तीन चार वर्षांत या कंपनीचे दिवाळे निघाल्यानंतर ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले असून यासंदर्भात आपल्या सातारा पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी तक्रारी दाखल आहेत. मात्र, यावर अद्याप ठेवीदारांना न्याय मिळाला नाही.
ठेवीदार व एजंटांनी केलेल्या तक्रारीनंतर गोयंका व त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली. आजमितीस कंपनीचे सर्व एजंट ठेवीदारांच्या तगाद्याने हैराण झाले असून पोलीस ठाण्यात तक्रारी करुन देखील त्यांना न्याय मिळालेला नाही. यामध्ये अनेक महिला भगिनी देखील एजंट असून त्यांना ठेवीदारांची बोलणी खावी लागत असल्याने त्या मानसिक, आर्थिक ताणतणाव सहन करत आहेत.
संबंधित टीम लीडरवर गुन्हे दाखल करुन ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत. यातील जे टीम लीडर आहेत त्यांनी कमीशनपोटी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कमवली आहे. संबंधित टिम लीडर व गोयंकांची मालमत्ता विक्री करुन ठेवीदारांचे पैसे मिळण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी मागणी उमेश चव्हाण यांनी केली आहे. यावेळी उत्तम अवघडे, मनिषा पाटील, मंगल कोल्हापुरे, शोभा पवार, बळवंत पवार तसेच ठेवीदार व महिला उपस्थित होत्या.