म्हसवड पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी लांबणीवर

सत्ताधारी आघाडीत धुसफूस; गटनेत्यांचीच गैरहजेरी
म्हसवड – म्हसवड पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी सत्ताधारी परिवर्तन आघाडीचे गटनेतेच गैरहजर राहिल्याने या निवडी बुधवारी होऊ शकल्या नाहीत. या निवडींसाठी सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत धुसफुस मात्र उघड झाली.
पालिकेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडी काल (दि. 8) होणार होत्या. मात्र, दुपारी सत्ताधारी परिवर्तन आघाडीचे गटनेते धनाजी माने एक वाजेपर्यंत पालिकेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे निवडीची प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यातच मुख्याधिकारी केरूरे या तब्बल दीड महिन्याने पालिकेत आल्या. त्यादेखील दुपारी बारा वाजता पालिकेत हजर झाल्याने या निवडीचा तिढा वाढला होता. धनाजी माने हे सकाळी 10 वाजेपर्यंत म्हसवडमध्ये होते. मात्र, नंतर अचानक गायब झाले. मात्र, त्यांच्या गायब होण्याचे कारण काय, यावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये चर्चा होती.
आ. जयकुमार गोरे यांच्या विरोधातील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या परिवर्तन आघाडीची पालिकेत सत्ता आहे. मात्र, या सत्ताधारी “मिसळी’त कटाचे व गटाच्या राजकारण असल्याने शहरात गेल्या तीन सव्वातीन वर्षांत कोणतेच ठोस विकासकाम झालेले नाही.
पालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्ये विकासकामांचे कागदोपत्री ठराव झाले; पण प्रत्यक्षात कामे झाली नसल्याचे सत्ताधारी आघाडीचे नगरसेवकच सांगतात. विशेष म्हणजे नगराध्यक्ष हे संपूर्ण शहराचे असताना प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवरील 25 टक्के विषय वीरकरवाडीतीलच असल्याचा आरोप सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांकडून केला जात होता.
पालिकेच्या या बेभरवशाच्या कारभारात सतत गैरहजर राहणाऱ्या मुख्याधिकारी केरूरे यांची भर पडली आहे. त्या महिनोन् महिने पालिकेत येतच नाहीत. या कारभाराचे वाभाडे स्वत: नगरसेवकच काढत आहेत. त्यात कालच्या प्रकाराची भर पडली आहे. गटनेते धनाजी माने गैरहजर राहिल्याने “टांगा पलटी अन् घोडं फरार’, अशी सत्ताधारी आघाडीची अवस्था झाल्याची खमंग चर्चा नगरसेवकांमध्ये होती.
नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव?
नगराध्यक्ष सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांच्या कामांबाबत दुजाभाव करत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी आहे. येत्या काही दिवसांत नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठऱाव आणला जाण्याची शक्यता असल्याचे सत्ताधारी आघाडीचे नगरसेवक दीपक बनगर यांनी सांगितले.





