पुणे- रिक्षात विसरलेला मोबाईल परत देण्यासाठी रिक्षा चालकाने सहा हजार रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात रिक्षा चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेखर सिदराम भंडारी (31 केशवनगर मुंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार रिक्षा चालक आदर्श बाबासाहेब परलकर याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे वडील सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्याकडे नुकताच घेतलेला दहा हजार रुपयांचा मोबाईल होता. ते 23 ऑक्टोबर रोजी मुळ गावी कर्नाटक येथे निघाले होते. यासाठी त्यांनी घरापासून गाडीतळ हडपसर येथे जाण्यासाठी ओला रिक्षा बुक केली होती. मात्र त्यांचा मोबाईल रिक्षामध्येच विसरला. ही बाब फिर्यादीला कळाल्यावर त्याने रिक्षा चालकाच्या मोबाईलनंबरवर वारंवार कॉल केला. यावेळी त्याने कॉल उचलल्यावर तुमचा मोबाईल माझ्याकडे असून तुम्ही मला सहा हजार रुपये ऑनलाईन सेंड केले तर मी मोबाईल परत देईल. अन्यथा मोबाइर्धलमधील वैयक्तीक डाटा बाहेरील लोकांना पाठवेल अशी धमकी दिली. यानंतर त्याने फिर्यादीला केशवनगर, वाघोली, हडपसर भागात बोलावले मात्र तेथे तो आला नाही. यामुळे त्यांनी अखेर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.