गुजरातमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांना मोठी मागणी

अहमदाबाद – हायड्रोक्सीक्लोरोक्वीन या गोळ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून मागवल्यानंतर गुजरातमध्ये या गोळ्या खरेदी करण्यासाठी नागरीकांनी ठिकाठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून या गोळ्यांचा साठा आपल्या घरात करून ठेवल्याचे व कारण नसताना लोकांकडून या गोळ्यांचे मोठ्या प्रमाणात सेवन सुरू असल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला यात हस्तक्षेप करावा लागला आहे.
मलेरियासाठी उपयुक्त असलेल्या या गोळ्या करोना रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी असल्याचे दिसून आल्याने गुजरातमध्ये अचानक या गोळ्यांची मागणी वाढली आहे. लोक करोनाच्या भीतीने या गोळ्यांचे सेवन मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. तथापी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेणे धोकादायक आहे असा इशारा सरकारने जनतेला दिला आहे.
डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय नागरीकांनाही या गोळ्या विकू नयेत अशी सुचना राज्य सरकारतर्फे औषध विक्रेत्यांना करण्यात आली आहे. या गोळ्यांच्या विक्रीबद्दल स्वतंत्र रजिस्टर ठेवून त्याच्या विक्रीची नोंद केली जावी अशी सुचनाही औषध विक्रेत्यांना करण्यात आली आहे.
या गोळ्यांची गरज लक्षात घेऊन गुुजरात अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील 28 कंपन्यांना हे औषध तयार करण्याची सुचना दिली आहे. त्यामुळे राज्यात या औषधाचा तुटवडा भासणार नाही असे या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





