नेवासा : शिरसगांव (ता. नेवासा) गावात जगदंबा मातेच्या मंदिरासमोर आणि बसथांबा परिसरात राजरोस अवैध दारू विक्री सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये असंतोष वाढला आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतर ग्रामस्थांनी नेवासा तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना लेखी निवेदन देत त्वरित कारवाईची मागणी केली. बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. ग्रामस्थांच्या निवेदनानुसार, या अवैध धंद्यामुळे मद्यपींचा भरवस्तीत धुडगूस सुरू असून महिलांना-पुरुषांना त्रास सहन करावा लागतोय. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महाविद्यालय आणि सरकारी रुग्णालय परिसरात दररोज मद्यपींचा गोंधळ चालतो. उलट, ग्रामस्थ मागणी करताच मद्यपींनी खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या आहेत. यामुळे गावाची शांतता धोक्यात सापडली असल्याचे ग्रामस्थ म्हणतात. शिरसगांव ग्रामपंचायतीने शुक्रवार सकाळी ११ वाजता हे निवेदन सादर केले. संतोष लंघे, लक्ष्मण देशमुख, बापूसाहेब देशमुख, सचिन गवांदे, अदिनाथ पोटे, बाबासाहेब इथापे, अक्षय लंघे, संतोष गवारे, ऋषीकेश जाधव, अमित पडघन, प्रदीप खजिंकर, गोट्या देशमुख आणि विजय पवार यांसह आदी नागरिक उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध धंदे उखडून टाकावेत, अन्यथा गावकरी रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.