Manchar : ठेकेदारांकडे बिले काढण्यासाठी टक्केवारीची मागणी?
Manchar : शहराच्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती जाणून घेण्यासाठी नगररचना विभागाचे अधिकारी दररोज उपस्थित राहावेत, अशी मागणी करूनही कार्यवाही झालेली नाही.

मंचर : नगरपंचायतीतील ठेकेदारांची कामांची बिले काढण्यासाठी टक्केवारी मागितली जात असल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्ष लक्ष्मण थोरात यांनी बुधवारी (ता. १८) मुख्याधिकारी किरण मार्कंड यांच्यासमोर केला. प्रशासकीय राजवटीतील ठेकेदारांची बिले प्राधान्याने काढली जातात, तर सध्याच्या ठेकेदारांना मात्र बिलांसाठी वारंवार चकरा माराव्या लागत असल्याचा आरोपही त्यांनी बुधवार, दि. १८ रोजी केला होता.
थोरात म्हणाले, नगरपंचायतीच्या कामकाजात अनेक त्रुटी असून ठेकेदारांच्या बिलांबाबत भेदभाव होत आहे. टक्केवारी मागितल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. शहराच्या विकास आराखड्याबाबत नागरिकांच्या हरकती जाणून घेण्यासाठी नगररचना विभागाचे अधिकारी दररोज उपस्थित राहावेत, अशी मागणी करूनही कार्यवाही झालेली नाही.
पाणीपुरवठा विभागातील १४ कर्मचाऱ्यांना प्रवास खर्च मिळत नसल्याने कामात अडचणी येत आहेत. तसेच रामदास बडे यांचा बांधकाम परवानगीचा प्रस्ताव वर्षभरापासून प्रलंबित आहे. रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी नगरपंचायतीला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी मुख्य अधिकारी यांच्या दालनात पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, ग्रामस्थ व पत्रकार उपस्थित होते.
यावर मुख्याधिकारी किरण मार्कंड यांच्याकडे पत्रकारानी विचारणा केली असता त्या म्हणाल्या बिल काढण्यासाठी टक्केवारी मागितल्याची तक्रार असल्यास चौकशी करून नियमानुसार कारवाई केली जाईल. ठेकेदारांची बिले उपलब्ध निधी व प्राधान्यक्रमानुसार काढली जातात. कर्मचाऱ्यांच्या प्रवास खर्चाबाबत मासिक बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले.





