नवी दिल्ली :- केजरीवाल सरकारवर कुरघोडी करण्यासाठी केंद्र सरकारने जे दिल्ली सेवा विधेयक संसदेत आणायचे ठरवले आहे त्याच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीने घेतला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहून दिल्ली सेवांवरील विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा व्हिप जारी केला आहे.
या पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे की,आमच्या सर्व खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करावे असे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. राज्यसभेत बीआरएसचे सात खासदार आहेत.त्यांच्या या निर्णयामुळे केजरीवालांनी चालवलेल्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.
इंडिया आघाडीतील कॉंग्रेस सह सर्वच पक्षांनी संसदेत या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि अजून बीजेडी या पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.
राज्यसभेत भाजपला स्पष्ट बहुमत नाही. तथापि त्यांना वायएसआर कॉंग्रेस, तेलगु देसम, बहुजन समाज पक्ष या पक्षांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.