पुणे जिल्हा | बारामतीच्या बांधावर दिल्लीचे शास्त्रज्ञ

बारामती, (प्रतिनिधी)- भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या विविध पिकांची संशोधन केंद्र आणि कृषी विद्यापीठे यांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत किती प्रभावीपणे पोहोचते. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र कशाप्रकारे भूमिका बजावत आहेत,
याचा आढावा सुरू आहे. या अंतर्गत बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माळेगाव येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेस शास्त्रज्ञ डॉ. संग्राम चव्हाण, डॉ. के. रवीकुमार यांनी भेट दिली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राने तीन वर्षांमध्ये राबवलेले उपक्रम, प्रशिक्षणे, प्रदर्शने पिके प्रात्यक्षिक, शेतीवरील चाचण्यांचे आयोजन त्याचा त्या शेतकऱ्यांना झालेला फायदा या संदर्भातील माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना सोशल मीडिया व इतर माध्यमांद्वारे मार्गदर्शन केले जाते.
त्यांच्याशी संपर्क साधण्याच्या पद्धती देशभरातील व राज्यातील विविध संस्था, कृषी विभाग, आत्मा, इतर संशोधन केंद्रे यांच्याशी असलेला समन्वय त्यांचे केंद्रास देण्यात येणारे तांत्रिक पाठबळ, शेतकऱ्यांद्वारे तंत्रज्ञान अवलंबनाचे प्रमाण,
शेतकऱ्यांचे वाढवलेले उत्पादन, शेतकऱ्यांच्या जीवनात दीर्घकालीन झालेला बदल, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केंद्रामार्फत स्थापन 51 शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट व कृषी विज्ञान केंद्रामधील उपलब्ध सोयी- सुविधा,
विविध निविष्ठा उपलब्धता, केंद्रातील अडी- अडचणी आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत सुरू असलेले उद्योग आदींबाबत माहिती केंद्र प्रमुख डॉ. धीरज शिंदे, विषय विशेषतज्ज्ञ संतोष गोडसे, संतोष करंजे,
डॉ. मिलिंद जोशी, डॉ. रतन जाधव. डॉ विवेक भोईटे, यशवंत जगदाळे, प्रफुल्ल पोटे, चंद्रकांत दाते, सुहास ननवरे यांच्याकडून घेतली. बारामती ऍग्रो स्टार प्रोडूसर कंपनीचे चेअरमन सुनील जगताप यांनी आढावा दिला.
दोन टनांपर्यंत मसाले विक्री
निंबूत तेथील बचत गटातील स्वाती काकडे यांनी 40 प्रकारचे मसाले उत्पादन व त्यांची विक्री भीमथडी व कृषीक प्रदर्शन व इतर ठिकाणी दरवर्षी दोन टनांपर्यंत होत असलेल्या मसाले पदार्थाची विक्रीची माहिती दिली.
केंद्राच्या प्रक्षेत्रावरील उसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI प्लॉट, स्वयंचलित सिंचन पद्धती, भाजीपाला कलम तंत्रज्ञान, मिलेट प्रक्रिया, मत्स्यपालन या प्रकल्पाची माहिती घेतली.
माळेगाव बुद्रुक येथील बाळासाहेब तावरे व संतोष गायकवाड यांच्या बलराम शेतकरी गटातील बीज प्रक्रिया सोयाबीन प्रात्यक्षिक प्लॉट, बीबीएफ मशीन पेरणीबाबत माहिती घेतली.
4000 टनांपर्यंत मुरघासची निर्मिती
केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संतोष गव्हाणे यांचा मत्स्य पालन व खेकडा उत्पादन केंद्रास भेट दिली.
जळगाव येथील अमोल लोणकर यांनी स्वतःच्या गोठ्यामध्ये मुरघासचा वापर करून इतर शेतकऱ्यांना मुरघास तयार करून सुमारे 4000 टनांपर्यंत शेतकऱ्यांना उत्पादन करून देत असल्याबाबत माहिती दिली.
दिलीप मेहर यांनी देसी कोर्स करून दुकानांमध्ये केलेले उत्पादनाबाबत माहिती सांगितली. अशोक पाटील तावरे यांनी केंद्रामार्फत होत असलेली मदतीबाबत माहिती दिली.



