पुणे जिल्हा | वारुळवाडीत बिबट्या जेरबंद

नारायणगाव, (वार्ताहर) – वारुळवाडी (ता. जुन्नर) परिसरातील कॉलेज रस्त्यावरील कृषी विज्ञान केंद्राजवळील वारुळे मळ्यात नर जातीच्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. बिबट्याने वारुळवाडीत दहशत निर्माण केल्याने पहाटे मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, वारुळे मळ्यातील चिमणवाडी डिंभा डावा कालवा परिसरात फिरणार्या नर बिबट्याला नारायणगावचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करताना पाहिले होते.त्यांनी तात्काळ त्या परिसरातील नागरिकांना सूचना देऊन काळजी घेण्याचे आवाहन केले होते.
तर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन दाते यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. त्यामध्ये भक्ष म्हणून कोंबडीला ठेवण्यात आले होते. अवघ्या 72 तासांत मंगळवारी (दि.4) पहाटेच्या दरम्यान मोठ्या नर जातीच्या बिबट्याला पिंजर्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.
बिबट्या अत्यंत आक्रमक दिसून येत होता.यावेळी ज्ञानेश्वर पवार, खंडू भुजबळ, आपदा मित्र सुशांत भुजबळ, ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, शंतनू डेरे, आपदा मित्र भरत मुठे, योगेश डेरे, वैभव डेरे,अथर्व रत्नपारखी, सचिन टावरे यांनी वनविभागाला मदत केली





