Delhi School Scam : दिल्लीत वर्गखोल्यांच्या बांधकामात कोट्यवधींचा घोटाळा ! एसीबीकडून मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन यांना समन्स

नवी दिल्ली : दिल्लीतील सरकारी शाळांमधील वर्गखोल्यांच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून एसीबीने आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना समन्स बजावले आहेत. एसीबीने सत्येंद्र जैन यांना ६ जून रोजी एसीबी कार्यालयात बोलावले आहे आणि मनीष सिसोदिया यांना ९ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.
या प्रकल्पात दिल्लीतील सुमारे १२,७४८ वर्गखोल्या आणि शाळा इमारतींचे बांधकाम करण्यात आले होते आणि त्यात भ्रष्टाचार आढळून आला आहे असा आरोप एसीबीने केला आहे. हा घोटाळा सुमारे २००० कोटी रुपयांचा आहे आणि कंत्राटे अत्यंत महागड्या दराने देण्यात आली आहेत. सरकारी शाळांमधील प्रत्येक वर्गखोल्याचे बांधकाम २४.८६ लाख रुपयांना केल्याचा आरोप आहे, जो सामान्य किमतीच्या जवळपास पाच पट आहे. असाही आरोप आहे की हा प्रकल्प ३४ कंत्राटदारांना देण्यात आला होता आणि त्यापैकी बहुतेक कंत्राटदार आपशी जोडलेले होते. एसीबीने आरोप केला आहे की नवीन निविदा न काढता प्रकल्पाची किंमत ३२६ कोटी रुपयांनी वाढवण्यात आली.
३० एप्रिल रोजी एसीबीने आम आदमी पक्षाच्या या दोन नेत्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सिसोदिया यांनी केजरीवाल सरकारमध्ये वित्त आणि शिक्षण दोन्ही विभाग सांभाळले होते. दुसरीकडे, सत्येंद्र जैन यांनी आरोग्य, उद्योग, वीज, गृह, नगरविकास आणि पीडब्ल्यूडी सारखी खाती सांभाळली. एफआयआर दाखल झाल्यानंतर, आम आदमी पक्षाने भाजपवर आरोप केले असून ही भाजपची राजकीय खेळी आहे असा दावा केला आहे.
यापूर्वी मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तर, सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्या दोघेही तुरुंगाबाहेर आहेत, परंतु आम आदमी पक्षाच्या या दोन मोठ्या नेत्यांचे टेन्शन पुन्हा वाढणार आहे.





