Delhi fire news : दिल्लीच्या पालम भागातील साध नगर येथील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली असून या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची ३० वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत. सकाळी तळमजल्यावर असलेल्या एका कॉस्मेटिकच्या दुकानाला आग लागली. आग वेगाने वरच्या मजल्यांवर पसरली. आगीच्या झपाट्याने पसरण्यामुळे संपूर्ण इमारत धुराने वेढली गेली. रहिवाशांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांनी मदतीसाठी हाका मारण्यास सुरुवात केली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू झाले. या दुर्घटनेत इतर तीन जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांनी आगीच्या ज्वालांपासून वाचण्यासाठी इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मृतांमध्ये प्रवेश (३३), कमल (३९), आशु (३५), लाडो (७०), हिमांशी (२२), दीपिका (२८) आणि तीन मुलांचा समावेश आहे. सचिन (२९), अनिल (३२) आणि दोन वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. स्थानिकांच्या मते, हे सौंदर्यप्रसाधनांचे दुकान होते. शोरूम घराच्या आत होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा स्थानिकांचा दावा आहे. आग लागली तेव्हा रहिवासी झोपलेले होते. घटनास्थळावरील व्हिडिओ फुटेजमध्ये इमारतीतून धुराचे दाट लोट आणि आगीच्या ज्वाला वर जाताना दिसत होत्या, तर अग्निशमन दलाचे जवान लोकांना वाचवण्यासाठी अरुंद गल्ल्या आणि धुराने भरलेल्या इमारतीच्या आतल्या भागात शिरले. आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. परिसर सील करण्यात आला असून, घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही आणि तपास सुरू आहे.