संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या टप्प्यात फारसा गोंधळ होताना दिसत नसला, तरी पुढील 15 महिन्यांत सहा राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे, त्याच्या हालचाली आताच सुरू झाल्या आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून त्याचा पहिला आठवडा संपला आहे. आज सोमवारपासून दुसर्या आठवड्यास सुरुवात होत आहे. अलीकडच्या काळात सभागृहात ज्या प्रकारचा गोंधळ बघायला मिळतो आहे तो आता थोडा मवाळ झाला असं म्हणावं लागेल. कारण, विरोधक संसदेमध्ये फारसा गोंधळ घालताना दिसत नाहीत. असं असलं तरी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आपली तलवार म्यान केली असं अजिबात नाही. लोकसभा आणि राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेससह तमाम विरोधक भाजप सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेऊन आहेत. केंद्र सरकार तपास संस्थेचा गैरवापर करीत असल्याच्या आरोपापासून ते मुघल शासक औरंगजेब आणि हिंदी-तमिळ वादापर्यंत प्रत्येक मुद्द्यावर सरकार विरोधकांच्या रडारवर आहे.
एवढंच नव्हे तर, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावलेल्या सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना आपले शब्द मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी लागली. सत्तापक्षाच्या नेत्यांनी चुकीचे शब्द वापरले आणि त्याचा परिणाम पक्षाला भोगावे लागले. यामुळे सत्ताधारी पक्षाने आपल्या नेत्यांना आक्रमक राहून विरोधकांवर हल्ला चढवित राहण्याचा सल्ला देतानाच शब्द थोडे जपून वापरा असा सल्लासुद्धा दिला. तिकडे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी रुपयाचे चिन्ह बदलून त्याचे तमिळ भाषेतील चिन्ह केले आहे. हा वाद भविष्यात मोठा होण्याची शक्यता आहे. किंबहुना, हिंदी-तमिळच्या मुद्द्याला कमजोर करण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्याला ऑक्सिजन दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. कारण, आगामी 15 महिन्यांच्या काळात देशातील सहा राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणे आहे. त्यात तामिळनाडूचाही समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय.
पुढील 15 महिन्यांत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणे आहे त्यात बिहार, आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. यातील बिहार, आसाम या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे. उर्वरित केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या तिन्ही राज्यांमध्ये विरोधकांचे सरकार आहे. भाजपचा या तिन्ही राज्यांवर डोळा आहे. गृहमंत्री अमित शहा यांचा अलीकडचाच तामिळनाडू दौरा खूप गाजला आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पश्चिम बंगालमधून भाजपचे 12 खासदार लोकसभेवर निवडून आले आहेत. तामिळनाडूमधून भाजपचा एकही नेता खासदार म्हणून निवडून आलेला नाही. केरळमध्ये मात्र सुरेश गोपी खासदार म्हणून लोकसभेवर निवडून आले आहेत. आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. बिहारमध्ये संयुक्त जनता दलासोबत सरकारमध्ये आहे.
भाजप पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या तीन राज्यांमध्ये अद्याप सरकार स्थापन करू शकलेले नाही.
आता भाजप पश्चिम बंगालमध्ये 2021च्या निवडणुकीचा परफॉर्मन्स अधिक चांगला करून सत्ता स्थापन करण्याची योजना आखत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केरळमधून एक जागा जिंकणारा भाजप आता विधानसभेत ताकद वाढविण्यासाठी मैदानात उतरला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर केरळचे प्रभारी आहेत. केरळ विधानसभेचा कार्यकाळ 23 मे 2026 रोजी संपत आहे. अशात राज्यातील हिंदू आणि ख्रिश्चन मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मागील काही वर्षांपासून हिंदू आणि ख्रिश्चन लोकांमध्ये जाऊन बैठका आणि सभा घेण्याची संख्या वाढली आहे. गेल्या ख्रिसमसला पंतप्रधान मोदी आणि अन्य नेते ज्या प्रकारे चर्चमधील प्रार्थना सभेत सहभागी झाले होते त्यावरून भाजपच्या योजनांचा अंदाज बांधला जाऊ शकतो.
दुसरीकडे, भाजप बिहारमध्ये सत्तेत सामील होऊ इच्छित नाही तर राज्याची सत्ता स्वतःच्या हातात घेऊ इच्छितो. भाजपने बिहारच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजना आखायला सुरुवात केली आहे. बिहार दिनाचे औचित्य साधून भाजप विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून भाजप बिहारच्या अस्मितेशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. 22 मार्च ‘बिहार दिवस’ म्हणून पाळला जातो. भाजप या दिवसाचा उत्सव 22 ते 30 मार्च असा आठवडाभर साजरा करणार आहे. एक भारत, श्रेष्ठ भारत आणि स्नेहसंमेलन अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून बिहारच्या मतदारांच्या जवळ जाण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
बिहारची संस्कृती आणि परंपरा सोबतच बिहारचा गौरव दर्शविणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यात नृत्य, पारंपरिक संगीत, भोजन संस्कृती यावर भर दिला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, बिहार दिनाचे कार्यक्रम केवळ बिहारमध्येच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी बिहारी नागरिकांची संख्या जास्त आहे त्याठिकाणी कार्यक्रम केले जाणार आहेत. भाजपच्या कार्यक्रमांचा प्रचार जास्तीत जास्त व्हावा यासाठी बिहारदिनाच्या कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ आणि संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जाणार आहेत.
दुसरीकडे, रालोआचा घटक पक्ष लोक जन शक्ती पक्षाचे प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान हेही मैदानात उतरले आहेत. बिहारमध्ये यंदाची खरी होळी नोव्हेंबरनंतर साजरी केली जाईल, जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत रालोआचा विजय होईल, असे चिराग पासवान यांनी म्हटले आहेत. थोडक्यात, बिहारसह पश्चिम बंगालची सत्ता स्वतःच्या हातात घेण्यासोबतच तामिळनाडू आणि केरळच्या विधानसभेत भाजप विधानसभांत संख्या कशी वाढेल, यावर फोकस करणार आहे. मतदारसंघाची पुनर्रचना विद्यमान आकडेवारीनुसार झाली तर दाक्षिणात्य राज्यांतील लोकसभेच्या जागा कमी होतील अशी भीती या राज्यांतील नेत्यांच्या मनात निर्माण झाली आहे. हा वाद भविष्यात आणखी उफाळून येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, सहा राज्यांच्या निवडणुकीत कोणते मुद्दे सर्वाधिक चर्चेत राहतील याचा अंदाज सध्याच्या परिस्थितीनुसार बांधला जाऊ शकतो.