दिल्ली वार्ता : मिशन-ए-तामिळनाडू

– वंदना बर्वे
गृहमंत्री अमित शहा यांच्या दक्षिण दौर्यादरम्यान भाजप आणि अन्नाद्रमुक या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीची रूपरेषा आखली आहे.
युतीची घोषणा करताना अमित शहा यांनी दोन्ही पक्ष एनडीएच्या मित्रपक्षांसोबत मिळून निवडणुका लढवतील आणि राज्यस्तरीय निवडणुका पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे सांगितले. भूतकाळातही अण्णाद्रमुकने भाजपसोबत युती केली होती. माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या काळातही एआयएडीएमकेने अटलबिहारी वाजपेयी सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, जयललिता यांनीच पाठिंबा काढून घेतल्याने केंद्रातील वाजेपयी यांचे 13 महिन्यांचे सरकार 17 एप्रिल 1999 रोजी फक्त एका मताने कोसळले होते. हे एक मत दुसर्या-तिसर्या कुणाचे नसून जयललिता यांचे होते.
जयललिता यांनी वाजपेयी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर अन्नाद्रमुक आपला पाठिंबा काढून घेईल अशी धमकी दिली होती. यात तामिळनाडूतील द्रमुकचे सरकार बरखास्त करावे ही एक मागणी होती. तत्कालिन सरकारने याकडे दुर्लक्ष केले. जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतला आणि वाजपेयी यांचे सरकार एका मताने कोसळले. यानंतर भाजपने जयललिता यांच्यावर भ्रष्टाचाराचे खूप आरोप केले होते. परंतु, राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी कायमचा मित्र नसतो असे म्हणतात.
एकेकाळी वाजपेयी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेणारा अन्नाद्रमुक पक्षाने आता भाजपला पाठीशी घातले आहे. अर्थात, विधानसभेच्या निवडणुकीत लहान भाऊ म्हणून स्वीकारले आहे. जयललिता यांच्या निधनापासून अन्नाद्रमुकला अस्तित्व टिकविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हे बघायला मिळाले आहे. 2016 मध्ये अण्णाद्रमुकने भाजपसोबत युती केली होती. 2021 मधील विधानसभेच्या निवडणुकीत युती केल्यामुळे भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, 2023 मध्ये अण्णाद्रमुकने भाजपसोबतची युती तोडली.
आता पुन्हा एकदा दोन्ही पक्षांनी हातमिळवणी केली आहे. यामागे राजकीय कारणेही आहेत. लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपला 11.4 टक्के मते मिळाली होती. मात्र, त्यांना एकही जागा मिळाली नाही. भाजपला आपले स्थान मजबूत करण्यासाठी प्रादेशिक पक्षाची आवश्यकता भासू लागली. गेल्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेला सुमारे 20 टक्के मते मिळाली होती; पण त्यांना एकही जागा मिळाली नाही. जर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली असती तर द्रमुक आणि त्यांच्या मित्रपक्षांना 39 जागांचा फटका बसला असता.
2026 मध्ये द्रमुक सरकार 10 वर्षे पूर्ण करणार आहे आणि सरकारविरुद्ध सत्ताविरोधी भावना देखील आहे. भाजप याचा फायदा घेऊ इच्छित आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन हे भाषा आणि सीमांकनाच्या मुद्द्यावर केंद्राविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहेत. यामुळे द्रमुकची ओळख हिंदूविरोधी पक्ष म्हणून झाली आहे. तर दुसरीकडे, अण्णाद्रमुकची प्रतिमा हिंदुवादी पक्षाची आहे. द्रमुकवर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप आहे. या कारणांमुळे, भाजपला अण्णाद्रमुक स्वतःच्या जवळ वाटले.
भाजपने तामिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष असलेले अन्नामलाई यांना पदावरून हटविले आहे. अन्नामलाई यांना हटविण्यामागचे कारण मजेदार आहे. तामिळनाडू भाजप अध्यक्ष अन्नामलाई यांची एक टेप भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याच्या हाती लागली आहे. यात अन्नामलाई यांचा एका पत्रकाराशी संवाद दाखविण्यात आला आहे. अन्नामलाई पत्रकाराला सांगत आहे की, ‘तामिळनाडूत भाजप कुठे आहे? मी माझा नवीन पक्ष सुरू करण्याचा विचार करत आहे. तामिळनाडूमधील हिंदू विचारधारेच्या लोकांना सोबत घेऊन पक्ष वाढवेल. मी नियुक्त केलेले भाजपचे सर्व जिल्हाप्रमुख देखील माझ्यासोबत येतील.’ ही टेप हाती लागताच भाजपच्या नेत्याने अन्नामलाई यांना दिल्लीत बोलाविले आणि एका वाक्यात समज दिली. या घटनेपासून अन्नामलाई पूर्ण शांत झाले आहेत. एक महिना उलटून गेला तरी त्यांच्या तोंडून एक शब्द बाहेर पडला नाही. यानंतर भाजपने नवे पक्षप्रमुख म्हणून अण्णाद्रमुकमधून आलेले नागेंद्रन यांचे नाव जाहीर केले.
तामिळनाडूचा समावेश अशा राज्यांमध्ये होतो जेथे सुरुवातीपासून क्षेत्रीय पक्षाचे सरकार राहिले आहे. येथील राजकारणसुद्धा प्रादेशिक पक्षांच्या अवतीभोवती फिरणारे आहे. ई. व्ही. रामास्वामी म्हणजेच पेरियार यांनी स्वातंत्र्यापूर्वीच द्रविड कळघम नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. स्वातंत्र्यानंतर, काँग्रेसचे सी. राजगोपालाचारी मद्रास रेसिडेन्सीचे पहिले मुख्यमंत्री बनले. नंतर मद्रास राज्य बनले आणि नंतर 1968 मध्ये राज्याचे नाव तामिळनाडू ठेवण्यात आले. सी. एन. अण्णादुराई, एम. करुणानिधी, एम. जी. रामचंद्रन द्रमुकचे मुख्यमंत्री झाले.
1972 मध्ये द्रमुकमध्ये फूट पडली आणि एम. जी. रामचंद्रन यांनी अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कळघमची स्थापना केली. द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष समान विचारसरणीच्या पक्षांपासून वेगळे झाले परंतु काळानुसार राजकीय पक्षांचे स्वरूप आणि विचारसरणी बदलली. कालांतराने एआयएडीएमकेची कमान जयललिता यांच्या हाती आली आणि डीएमकेची कमान करुणानिधी यांच्या हातात आली. तेव्हापासून राज्याची सत्ता कधी एआयएडीएमकेच्या हातात होती तर कधी डीएमकेच्या हातात राहिली आहे. सध्या करुणानिधी यांचे पुत्र एम. स्टॅलिन मुख्यमंत्री आहेत, तर अण्णाद्रमुकची कमान माजी मुख्यमंत्री ई. के. पलानीस्वामी यांच्याकडे आहे.
234 विधानसभेच्या जागा असलेल्या दक्षिणेतील या सर्वात मोठ्या राज्यात प्रभावी हस्तक्षेप करण्यासाठी भाजपने विकास आणि विश्वासाची कास पकडली आहे. पण द्रमुकचा प्रादेशिकवाद आणि द्रविड अस्मितेचे राजकारण भेदून काढणे भाजपसाठी सोपे नाही. द्रमुकच्या प्रादेशिक राजकारणाला निष्प्रभ करण्यासाठी भाजप विविध मोर्चांवर काम करत असल्याचे दिसते. लोकसभेच्या 39 जागा असलेले हे राज्य दक्षिणेत भाजपच्या विस्तारात मोठा अडथळा निर्माण करत आहे. जवळजवळ एक दशकापासून भाजपचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत.





