Politics News : दिल्लीत 1 नोव्हेंबरला काॅंग्रेस आणि भाजपचाही मोर्चा; काय आहे नियोजन पाहा
Politics News : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा निघणार आहे. त्याच दिवशी भाजपही ५ हजार लोकांच्या सहभागातून पायी मोर्चा काढणार आहे.

Politics News : दिल्लीत १ नोव्हेंबरला इंडिया आघाडी आणि भाजपचे स्वतंत्र पायी मोर्चे निघणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि कथित ‘मतचोरी’च्या विरोधात इंडिया आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले आहे. हा मोर्चा दुपारी १२ वाजता कनॉट प्लेस येथून सुरू होऊन रामलीला मैदानावर पोहोचेल. त्यानंतर येथे विरोधकांची सभा होणार आहे.
दरम्यान, भाजपनेही त्याच दिवशी तिलक नगर ते हरिनगर असा पायी मोर्चा काढण्याची योजना आखली आहे. सकाळी ११ वाजता सुरू होणाऱ्या या मोर्चात सुमारे ५ हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे. १९८४ मधील शीखविरोधी दंगलीतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही यात सहभाग असेल. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासह भाजपचे प्रमुख शीख नेतेही या मोर्चात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
भाजपच्या मोर्चामागे पंजाब निवडणुकीचे गणित?
१ नोव्हेंबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत शीखविरोधी दंगली उसळल्या होत्या. तिलक नगर आणि हरिनगर परिसरालाही या दंगलींचा मोठा फटका बसला होता. या हिंसाचारात अनेक शीख नागरिकांची हत्या झाली होती. या प्रकरणात काँग्रेसचे काही नेते आरोपी ठरले होते. त्यामुळे शीख मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या आणि त्यांच्याशी एकजूट दाखवण्याच्या उद्देशाने भाजपने हा मोर्चा आयोजित केल्याचे सांगितले जात आहे.





