दिल्लीतील लाडक्या बहिणींना कधीपासून मिळणार 2500 रुपये? महिला दिनी मोठी घोषणा होण्याची शक्यता

Mahila Samriddhi Scheme | सध्या प्रत्येक राज्य सरकारकडून महिलांसाठी विशेष कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना चर्चेत असतानाच, आता दिल्लीतही ‘महिला समृद्धि योजना’ राबवली जाणार आहे. दिल्लीत 27 वर्षांनी भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. निवडणुकीच्याकाळात या योजनेंतर्गत महिलांना दरमहिन्याला 2500 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आज महिला दिनाच्या निमित्ताने दिल्ली सरकारकडून या योजनेची घोषणा केली जाऊ शकते.
दिल्ली सरकारची दुसरी मंत्रिमंडळ बैठक आज होणार आहे. या बैठकीत महिलांना दरमहा 2500 रुपये देणाऱ्या महिला समृद्धी योजनेला मंजुरी दिली जाईल. दिल्ली प्रदेश महिला मोर्चाने जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात याची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली निवडणुकीत गरीब महिलांना 2500 रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती की, दिल्लीत सत्तेत येताच 8 मार्चपासून महिलांच्या खात्यात 2500 रुपये जमा करण्यास सुरुवात होईल. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. 8 मार्चपर्यंत दिल्लीतील बहिणींच्या खात्यात 2500 रुपये पोहोचण्यास सुरुवात होईल, असे ते म्हणाले होते. त्यामुळे आजपासून अधिकृतरित्या ही योजना लागू होऊन नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल व पुढील काही दिवसात रक्कम मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
या महिलांना मिळणार योजनेचा लाभ
महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला समृद्धी योजनेची घोषणा झाल्यानंतर नोंदणी सुरू होईल. नोंदणीसाठी एक पोर्टल देखील तयार करण्यात आले आहे. दिल्लीतील मतदार असलेल्या 21 ते आणि 60 वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल. विधवा पेन्शन, वृद्धापकाळ पेन्शन किंवा इतर कोणत्याही सरकारी आर्थिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच, योजनेसाठी काही आर्थिक निकष देखील लागू असतील.





