नवी दिल्ली – दिल्लीतील हैदरपूर प्लांटमध्ये तैनात असलेल्या जवानाने आपल्या तीन सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. ही घटना सोमवारी घडली. या घटनेत दोन जवानांचा मृत्यू झाला असून तिसर्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. किरकोळ भांडणानंतर आरोपी जवानाने त्याच्या साथीदारांवर गोळीबार केल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जवान हा सिक्कीम पोलिस दलातील आहे. घटनेनंतर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीने आत्मसमर्पण केले. पोलिसांनी मृत जवानांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर अन्य एका जखमी जवानाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अलीकडच्या काळात पोलीस/लष्करी कर्मचारी संतप्त होऊन त्यांच्याच साथीदारांवर गोळीबार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. याचे कारण सैनिकांची जास्तवेळ ड्युटी आणि कठीण कामाची परिस्थिती असल्याचे मानले जाते. गेल्या आठवड्यात, जम्मू-काश्मीरमध्ये अशीच एक घटना समोर आली होती, लष्कराच्या प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाने शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता पूंछच्या सुरनकोटमध्ये आपल्या साथीदारांवर गोळीबार केला होता. या घटनेत दोन जवान मृत झाले तर दोघे जखमी झाले. यानंतर या जवानाने स्वत:वरही गोळी झाडली होती. यात त्याचा मृत्यू झाला होता.
याच वर्षी मार्चमध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्येही अशीच घटना घडली होती. पश्चिम बंगालमधील सागरपारा येथे बीएसएफच्या 117 बटालियनमधील बीएसएफचे मुख्य हवालदार एचजी शेखरन यांच्यावर चीफ कॉन्स्टेबल जॉन्सन टोप्पोने गोळ्या झाडल्या. नंतर त्याने आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवरही गोळी झाडली. दोघांनाही तात्काळ सागरपारा येथील जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.