Delhi Election 2025 : दिल्लीसाठी करदिलासा ठरणार गेमचेंजर? भाजपच्या नेत्यांना वाटतेय आशा

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला मोठा करदिलासा देण्यात आला. ती बाब दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेत्यांना तरी तशी आशा वाटत आहे.
दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ते जवळ येऊन ठेपले असतानाच केंद्रीय अर्थसंकल्पाने मध्यमवर्गाला खुषखबर दिली.
ती दिल्लीतील भाजप नेत्यांनाही सुखावणारी ठरली आहे. निवडणूक विचारात घेऊन निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला दिल्लीकेंद्रित घोषणा करण्यास मनाई केली होती. अशात करदिलाशाकडे भाजपचे नेते दिल्ली रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक घडामोड म्हणून पाहत आहेत.
दिल्लीत सुमारे ४० लाख प्राप्तिकरदाते आहेत. त्यामुळे अर्थातच तेथील मध्यमवर्ग ही महत्वाची मतपेढी मानले जाते. आता त्या मतपेढीला आकर्षित करण्याची महत्वाची संधी भाजपला प्राप्त झाली आहे.
त्यादृष्टीने दिल्ली भाजपचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांची प्रतिक्रिया बोलकी ठरावी. करदिलाशाची घोषणा अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे मध्यमवर्गाचा भाजपवरील विश्वास वाढेल. संबंधित घोषणेचा लक्षणीय प्रभाव दिल्ली निवडणुकीवर पडेल, असे त्यांनी म्हटले.
भाजप मध्यमवर्गाची काळजी घेत असल्याचे केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले. त्यामुळे निवडणुकीत मध्यमवर्गाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात भाजपला मिळेल, असा विश्वास आणखी काही नेत्यांनी बोलून दाखवला.
काही दिवसांपूर्वीच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मध्यमवर्ग आणि करांच्या मुद्द्यांवरून भाजप, कॉंग्रेस या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधला होता. केंद्रातील पाठोपाठच्या सरकारांनी नेहमीच मध्यमवर्गाकडे दुर्लक्ष केले आहे. तो वर्ग कर दहशतवादाचा बळी ठरला आहे.
दिल्लीकर १.७८ लाख कोटी रूपयांचा प्राप्तिकर भरतात. त्या तुलनेत दिल्लीला केंद्रीय करांमधील अल्प वाटा मिळतो, असे त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गाला देण्यात आलेला दिलासा भाजपसाठी निवडणुकीच्या दृष्टीने मास्टरस्ट्रोक ठरणार का, ते लवकरच स्पष्ट होईल.





