Arvind Kejriwal | Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष उद्या (सोमवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल दुपारी १२ वाजता आपचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील. भारतीय जनता पक्षाने शनिवारी ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध केले. भाजपने आपला जाहीरनामा तीन टप्प्यात सादर केला आहे. ज्यामध्ये दिल्लीतील जनतेला अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. संकल्प पत्राचा तिसरा भाग केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रसिद्ध केला. आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, ‘आज मी दिल्ली २०२५ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचा शेवटचा भाग प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हा सर्वांसमोर आलो आहे. भाजपच्या परंपरेप्रमाणे, आम्ही निवडणुका खूप गांभीर्याने घेतो, आम्ही निवडणुकांना जनसंपर्काचे माध्यम देखील मानतो. आणि निवडणुकांद्वारे स्थापन होणाऱ्या सरकारांची धोरणात्मक रचना निश्चित करण्यासाठी, आम्ही जनतेमध्ये जातो आणि निवडणुकीत भाजपकडून त्यांच्या अपेक्षांबद्दल माहिती गोळा करतो’. असं ते म्हणाले. संकल्प पत्र-३ मध्ये कोणती आश्वासने दिली आहेत : अमित शहा म्हणाले की, ‘जर आमचे सरकार सत्तेत आले तर आमचे सरकार दिल्लीतील रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक मदत करेल. याशिवाय, १७०० अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना मालकी हक्क आणि बांधकाम आणि विक्रीचा अधिकार दिला जाईल. – यमुना नदीकाठचा विकास करणार. – दिल्लीमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जातील. – आयुष्मान योजनेचा लाभ देईल. – तरुणांना ५० हजार सरकारी नोकऱ्या देणार. – १३ हजार बसेस ई-बसमध्ये रूपांतरित केल्या जातील. – दिल्लीतील सीलबंद दुकाने सहा महिन्यांत पुन्हा उघडली जातील. – दुकाने मोकळीक मिळावी यासाठी काम केले जाईल. – गिग कामगारांना ५ लाख रुपयांचा अपघात विमा दिला जाईल. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाईल. – नोंदणीकृत कामगारांना टूलकिट, कर्ज आणि अपघात विम्यासाठी कामगारांना १०,००० रुपयांची मदत.