Axar Patel removed from Delhi Capitals captaincy : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी सर्वच संघांनी कंबर कसली असताना, दिल्ली कॅपिटल्स (DC) च्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षरने आयपीएल २०२५ मध्ये संघाचे नेतृत्व केले होते, मात्र आगामी हंगामात तो केवळ एक खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. केएल राहुलकडे सोपवली जाणार कमान? अक्षर पटेलच्या जागी संघाचे नेतृत्व कोण करणार, यावरही आता पडदा पडला आहे. अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज केएल राहुल हा कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे समजते. राहुलकडे यापूर्वी पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आहे. फ्रँचायझीला आशा आहे की, राहुलच्या अनुभवामुळे संघाला नवी ऊर्जा मिळेल आणि दिल्लीला पहिले विजेतेपद मिळवून देण्यात तो यशस्वी ठरेल. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. का झाला हा बदल? २०२५ च्या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली दिल्लीने १४ पैकी ७ सामने जिंकले होते. संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला होता, परंतु थोडक्यात प्ले-ऑफची संधी हुकली होती. व्यवस्थापनाला आता एका अनुभवी आणि धोरणात्मक नेतृत्वाची गरज वाटत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. अक्षर संघाचा महत्त्वाचा कणा असला, तरी नेतृत्वाची जबाबदारी राहुलच्या खांद्यावर जाण्याची दाट शक्यता आहे. हेही वाचा – Yuzvendra Chahal : युझी चहलने आरजे महावशला नव्हे, तर ‘या’ खास व्यक्तीला गिफ्ट केली नवी कोरी BMW कार टीम इंडियामध्ये मात्र मोठी पदोन्नती! आयपीएलमध्ये कर्णधारपद गेले असले, तरी भारतीय संघात अक्षर पटेलचे वर्चस्व वाढले आहे. बीसीसीआयने आगामी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी अक्षर पटेलची उपकर्णधार म्हणून निवड केली आहे. शुबमन गिलच्या जागी ही जबाबदारी आता अक्षरकडे सोपवण्यात आली आहे. त्याचे सातत्यपूर्ण प्रदर्शन आणि अष्टपैलू कामगिरी पाहता बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे.