नवी दिल्ली – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. मत विभाजन टाळण्यासाठी शिंदेसेनेकडून ते राजकीय पाऊल उचलण्यात आले आहे.
शिंदे यांनी वेगळी वाट धरल्याने २०२२ यावर्षी शिवसेनेत फूट पडली. त्याआधी अविभाजित शिवसेनेने फारशी राजकीय ताकद नसतानाही दिल्लीतील काही निवडणुका लढवल्या. मात्र, आता शिंदेसेनेने मित्रपक्ष भाजपच्या पाठिशी उभे राहण्याचे ठरवले आहे. त्या पाठिंब्याचे पत्र शिंदे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पाठवले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीचा अंगिकार आम्ही केला आहे. विचारसरणीचा वारसा पुढे नेत आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली एनडीएचा सक्रिय घटक बनला आहे. देशाच्या राजधानीत भ्रष्टाचारमुक्त आणि समर्थ सरकारची आवश्यकता आहे. तसे सरकार भाजप देऊ शकतो.
त्यामुळे आमच्या पक्षाच्या दिल्ली शाखेला मी भाजपशी समन्वय साधून त्या पक्षाच्या प्रचारात सहभागी होण्याची सूचना केली आहे, असे शिंदे यांनी पत्रात नमूद केले. एनडीएप्रमाणेच महाराष्ट्रातील सत्तारूढ महायुतीचे भाजप आणि शिंदेसेना हे घटक आहेत. त्यांचा मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार पक्षाने मात्र दिल्लीच्या राजकीय रणसंग्रामात स्वतंत्रपणे उडी घेतली आहे.