Delhi Airport : दिल्ली विमानतळावरील चौथी धावपट्टी कार्यान्वित

नवी दिल्ली – दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी चौथी धावपट्टी आणि दुहेरी ईस्टर्न क्रॉस टॅक्सीवे कार्यान्वित झाले आहे. ज्यामुळे देशातील सर्वात मोठ्या विमानतळाची क्षमता आणि कार्यक्षमतेत वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
नजीकच्या भविष्यात वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता 109 दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी चौथ्या धावपट्टीचे आणि ईसीटीचे उद्घाटन केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशाचे नागरी विमान वाहतूक क्षेत्र एका वळणाच्या टप्प्यावर आहे आणि विकासाच्या टप्प्याची ही नवी सुरूवात आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आता चार धावपट्टी आणि ईसीटी असलेले देशातील पहिले विमानतळ बनले आहे. ते दररोज सुमारे 1,500 विमानांच्या हालचाली हाताळते.
नव्या व्यवस्थेमुळे येथून आता दररोज दोन हजार विमानांची येजा सुरू राहिल. सध्या, या विमानतळाची क्षमता प्रति वर्ष 70 दशलक्ष प्रवासी आहे, लवकरच हे दिल्ली विमानतळ त्याच्या क्षमतेमध्ये अटलांटा विमानतळालाही मागे टाकेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
ईसीटीच्या कार्यान्वित झाल्यामुळे, विमानांसाठी टॅक्सीवे वर चालवण्याची वेळ सुमारे 20 मिनिटांपेक्षा कमी होऊन ती 10-12 मिनिटांवर येईल, असे शिंदे म्हणाले.





