PUNE : पालिका कर्मचाऱ्यांचा बोनस लांबणीवर? बिले चुकल्याने प्रशासनावर नामुष्की

पुणे – महापालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दिवाळी बोनस अडचणीत आला आहे. दरवर्षी प्रमाणे कर्मचाऱ्यांना मूळ वेतन आणि महगाई भत्त्यावर 8.33 टक्के सानुग्रह अनुदान आणि 21 हजार रूपये बक्षिस देण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठीची बिले तयार करताना ती सातवा वेतन आयोगाच्या धर्तीवर तयार न करता सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे तयार करण्यात आली आहेत.
त्यामुळे, सर्व बिले प्रशासनास नव्याने करावी लागणार असून त्याला वेळ लागणार असल्याने ऐन सणासुदीत कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान तसेच बक्षिसाची रक्कम दिली जाते. दरवर्षी यात गोंधळ होत असल्याने दिवाळीच्या एकदोन दिवस आधी हे पैसे कर्मचाऱ्यांना मिळतात. परिणामी, हे कर्मचारी नाराजी व्यक्त करतात त्यामुळे प्रशासनाने यावर्षी एक महिना आधीच आदेश काढत याची तयारी सुरू केली.
30 ऑक्टोबरच्या आत ही बिले सादर करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, स्पष्ट सूचना देण्यात न आल्याने क्लार्ककडून सहाव्या वेतन आयोगानुसार बिले तयार करण्यात आली. त्यामुळे, कार्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत तब्बल 10 ते 20 हजारांचा फरक पडला. हे लक्षात आल्यानंतर प्रशासनावर पुन्हा नव्याने बिले तयार करण्याची नामुष्की ओढावली आहे. ही बिले तयार करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांचा कालावधी जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना यंदाही उशीराच बोनस मिळणार आहे.





