Dehu voter verification: देहूकर नागरिकांनो लक्ष द्या! मतदार पडताळणीसाठी ३ दिवसीय शिबिर; ‘हे’ कागदपत्रे सोबत ठेवा
Dehu voter verification: भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत पाऊल; १७ ते १९ जुलै दरम्यान सकाळी ९ ते ६ वेळेत शिबिराचे आयोजन.

Dehu voter verification – भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार पडताळणीसाठी ईएफ फॉर्मचे वितरण आणि भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी देहू नगरपंचायत हद्दीतील मतदारांच्या सोयीसाठी शुक्रवार ते रविवार (दि. १७ ते १९) या कालावधीत तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत देहूच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आले आहे.
देहू नगरपंचायत हद्दीतील सर्व पात्र मतदारांनी शिबिरात उपस्थित राहून आपला ईएफ फॉर्म भरून घ्यावा, असे आवाहन बीएलओ आणि निवडणूक प्रशासनाच्या वतीने मतदारांना करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बीएलओ सध्या घराघरांत जाऊन ईएफ फॉर्मचे वितरण व भरण्याची प्रक्रिया राबवत आहेत. मात्र, अनेक नागरिक घरात उपलब्ध नसणे, काही घरे बंद असणे किंवा पत्ता शोधण्यात अडचणी येणे, अशा कारणांमुळे सर्व मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही.
त्यामुळे कोणताही पात्र मतदार या प्रक्रियेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात २० हून अधिक बूथ लेव्हल अधिकारी कार्यरत असून ते मतदारांना ईएफ फॉर्म भरण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य करणार आहेत. ज्या मतदारांपर्यंत बीएलओ अद्याप पोहोचू शकले नाहीत किंवा ज्यांना फॉर्म भरण्याबाबत अडचणी आहेत, त्यांनी संबंधित बीएलओशी संपर्क साधून या शिबिराचा लाभ घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शिबिराला येताना आवश्यक कागदपत्रे
ईएफ फॉर्मसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, चालू मोबाईल क्रमांक, स्वतःचे आणि आई-वडील किंवा आजी-आजोबा यांची सन २००२ मधील मतदार यादीतील मतदार क्रमांक, उपलब्ध असल्यास भाग क्रमांक आणि अनुक्रमांक यांचा समावेश आहे. ही माहिती उपलब्ध नसल्यास संबंधित बीएलओ नागरिकांना आवश्यक मदत करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.





