Dehu News: देहूकरांसाठी मोठी बातमी! कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न अखेर सुटला; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Dehu News: १ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर असूनही जमिनीअभावी रखडलेली प्रक्रिया मार्गी; कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा.

Dehu News – देहू नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मोठा दिलासा मिळाला असून हवेली तालुक्यातील मौजे विठ्ठलनगर येथील गट क्रमांक ९७ मधील दोन हेक्टर शासकीय जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. महसूल व वन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभागांच्या अहवालांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला.
या जागेचा वापर केवळ घनकचऱ्याच्या प्रक्रिया व व्यवस्थापनासाठीच करता येणार असून अन्य कारणासाठी वापर करण्यासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. आदेशानुसार, जागेचा ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत प्रकल्प सुरू करणे बंधनकारक आहे. तसेच पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही,
याची काळजी घेण्याच्या अटीही घालण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे देहू नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला गती मिळणार असून शहरातील वाढत्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देहू नगरपंचायतीसाठी एक कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मंजूर झाला असला,
तरी गट क्रमांक ९७ मधील दोन हेक्टर गायरान जमीन नगरपंचायतीच्या नावावर नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले होते. ही जागा नगरपंचायतीच्या ताब्यात देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार सुनील शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करीत पाठपुरावा केला होता .





