Dehu Nagar Panchayat: देहू नगरपंचायतीत समित्यांमध्ये मोठा फेरबदल? बुधवारी होणार सभापतींची निवड; राजकीय घडामोडींना वेग
Dehu Nagar Panchayat: देहू नगरपंचायतीच्या केवळ दोन विषय समित्यांच्या सभापतींची होणार निवड; उर्वरित समित्यांमध्ये सदस्यांची फेररचना होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग.

Dehu Nagar Panchayat – देहू नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती आणि सदस्यांच्या फेरबदलाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. येत्या बुधवारी (दि. १५) होणाऱ्या निवड प्रक्रियेत केवळ दोन समित्यांच्या सभापतींची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उर्वरित विषय समित्यांमध्ये सदस्यांची फेररचना होणार असल्याने नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देहू नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे,
त्यामुळे सर्व निर्णयांमध्ये पक्षांतर्गत समन्वयाला विशेष महत्त्व दिले जाते. नगरपंचायत क दर्जाची असल्यामुळे महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियमानुसार नगराध्यक्षांकडे स्थायी समितीचे सभापतीपद आणि उपनगराध्यक्षांकडे स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापतीपद आपोआप राहते. त्यामुळे या दोन समित्यांच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता अत्यल्प मानली जात आहे. मात्र इतर विषय समित्यांच्या सभापतीपदांबाबत आणि सदस्यांच्या फेररचनेबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रथम नगराध्यक्ष म्हणून स्मिता चव्हाण यांनी नगरपंचायतीची धुरा सांभाळली. त्यानंतर नगराध्यक्षपदाची जबाबदारी पूजा दिवटे यांच्याकडे आली. नियमानुसार स्थायी समितीचे सभापतीपदही त्यांच्याकडेच कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपंचायतीत आतापर्यंत पाच उपनगराध्यक्ष झाले असले तरी सध्या प्रियंका मोरे या उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीचे सभापतीपदही त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे विद्यमान सभापती सुधीर काळोखे यांनी गेल्या चार वर्षांत शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याची चर्चा आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई, वाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठ्यावरील ताण या आव्हानांमध्ये त्यांनी प्रभावी समन्वय साधल्याचे सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवक मान्य करतात. त्यामुळे या समितीच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडेच सोपविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





