Degree Admission : पदवी प्रवेशाचा ‘श्रीगणेशा’! टॉप कॉलेजेसमध्ये आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरू; ९० टक्क्यांच्या पेचामुळे कट-ऑफ घसरणार?
Degree Admission : राज्यातील ७५ ते ९० टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली; नामांकित महाविद्यालयांच्या पहिल्या मेरिट लिस्टमध्ये कट-ऑफ घसरण्याचे संकेत.

Degree Admission – राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर आता कॉलेज कँपसमध्ये पदवी प्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याने नामांकित महाविद्यालयांमधील पदवी प्रवेशाचा कट-ऑफ खाली येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयांनी सोमवारपासून (दि. ४) बीए, बीकॉम आणि बीएससी या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली असून, ऑनलाइन अर्जांची लिंक उद्यापासून खुली होणार आहे.
राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा राज्यातील निकालाचा टक्का तर घटलाच आहे, पण ७५ ते ९० दरम्यान गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. यंदा ७ हजार ५१० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या ८ हजार ३५२ होती. म्हणजेच, टॉप स्कोअरर्सच्या संख्येत तब्बल ८४२ ने घट झाली आहे. तसेच, ४५ ते ६० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची (४५.०३ टक्के) आहे. त्यामुळे यंदा पदवी प्रवेशाचा कटआॅफ घसरण्याची शक्यता आहे.
महाविद्यालये सज्ज
निकालानंतर आठवड्याभराने प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असा पालकांचा अंदाज होता, मात्र महाविद्यालयांनी निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच प्रवेश प्रक्रियेला वेग दिला आहे. मॉडर्न महाविद्यालय, स. प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय आणि मराठवाडा मित्र मंडळ (एमएमसीसी) यांसह अनेक संस्थांनी ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
संकेतस्थळावर माहिती
मॉडर्न महाविद्यालयाचे उपप्राचार्य शामकांत देशमुख यांनी आम्ही सोमवारपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले आहे. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. अविनाश मोहरील, गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विलास उगले, मराठवाडा मित्र मंडळ काॅलेज आॅफ काॅमर्सचे प्राचार्य डाॅ. किशोर निकमसह अन्य प्राचार्यांनी पदवी प्रथम वर्ष प्रवेशास उद्यापासून सुरु केले जाणार असल्याचे सांगितले आहे. सविस्तर माहिती संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सीईटी निकालाची प्रतीक्षा
पारंपरिक अभ्यासक्रमांचे प्रवेशप्रक्रिया सुरु झाले असले, तरी व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे अद्याप निकालांकडेच आहेत. सायन्स शाखेतील विद्यार्थी एमएचटी-सीईटीच्या निकालाची वाट पाहत आहेत. कॉमर्समधील विद्यार्थी बीबीए आणि बीसीए यांसारख्या अभ्यासक्रमांच्या सीईटी निकालाकडे लक्ष लावून आहेत. त्यानंतरच विद्यार्थी पदवी प्रवेशाचा विचार करतील.
मूळ कागदपत्रांची गरज
सध्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असली, तरी प्रत्यक्ष प्रवेशाची औपचारिकता मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) मिळाल्यावरच पूर्ण होईल. ही दोन महत्त्वाची कागदपत्रे असल्याशिवाय पदवी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे बोर्डाकडून ओरिजनल मार्कलिस्ट मिळताच व महाविद्यालयांकडून एलसी मिळताच खऱ्या अर्थाने पदवी प्रवेशाला गती मिळणार आहे.





