नारायणगाव : वनस्पती शास्त्र उद्यान दिशादर्शक उपक्रम असून विद्यार्थ्यांमार्फत देशी वृक्षांची जागृती झाल्यास त्याचे आर्थिक महत्त्व लक्षात आल्यानंतर जंगलाचा होणारा र्हास टाळता येईल असे प्रतिपादन ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी केले. विद्यार्थ्यांना देशी वृक्षांची ओळख होऊन वृक्षांच्या उपयोगितेबद्दल जनजागृती व्हावी. तसेच दिवसेंदिवस निसर्गाच्या होणारा -हास टाळण्यासाठी ग्रामोन्नती मंडळ दहा गुंठे क्षेत्रावर वनस्पती शास्त्र उद्यान (बोटॅनिकल गार्डन) ची उभारणी करणार असून त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मेहेर बोलत होते. यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे, उपाध्यक्ष शशीकांत वाजगे, कार्यवाह रवींद्र पारगावकर, कृषी शिक्षण संकुलाचे प्रमुख रत्नदीप भरवीरकर, टॉमटॉम इंडिया कंपनीच्या दया उगले, व्यवस्थापक महेश ववले, निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे संचालक माणिक धर्माधिकारी, सागर वाघ, राहुल घोलप , मारुती साळुंखे, प्रा. वारे, प्रक्षेत्र व्यवस्थापक त्रिंबक टकले आदी मान्यवर, विद्यार्थी उपस्थित होते. दया उगले यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. निसर्गराजा मित्र जीवांचे संस्थेचे संचालक राहुल घोलप यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल आणि कार्याबद्दल माहिती दिली. मान्यवरांना पर्यावरण पूरक आंबारोप आणि आंब्याचे पुस्तक देऊन गौरविण्यात आले अशी माहिती कृषी शिक्षण संकुलाचे प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड यांनी दिली. वनस्पती शास्त्र उद्यानासाठी टॉमटॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आर्थिक सहाय्य तर उभारणीसाठी तांत्रिक सहाय्य निसर्गराजा मित्र जीवांचे अशासकीय संस्थेने केले आहे. वनस्पती शास्त्रीय उद्यान विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाची प्रेरणा देईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतीक्षा अभंग भुजबळ यांनी तर प्रा.अशुतोष वारे आभार यांनी केले.