पुणे विभागातील परीक्षा केंद्रांची झाडाझडती

डॉ. राजू गुरव
पुणे – पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील बड्या अधिकाऱ्यांमार्फत इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांची झाडाझडती होणार आहे. परीक्षा केंद्रात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध आहेत का, याची कसून तपासणी होणार आहे. सुविधा नसल्यास संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. नवीन परीक्षा केंद्रांना मान्यता देण्यापूर्वीच या सुविधांची तपासणी करावी लागते. तसेच जून्या केंद्रातील सुविधांचीही पडताळणी केली जाते.
दहावीसाठी 200 तर बारावीसाठी 250 विद्यार्थ्यांसाठी एक केंद्र मंजूर केले जाते. परीक्षेसाठी विद्यार्थी शुल्क भरतात, त्यामुळे त्यांना आवश्यक त्या सुविधा व्हायला हव्यात. बैठक व्यवस्था, बेंचेस, लाईट, पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे असणे अनिवार्य आहे. पिण्यासाठी पाणीही आणि स्वच्छतागृहाचीही सुविधा हवी. आगामी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पुणे बोर्डाच्या अध्यक्षा मंजुषा मिसकर सोलापूर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना भेट देणार आहे. पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची तपासणी बोर्डाचे विभागी सचिव औदुंबर उकिरडे, सहसचिव डॉ. मीनाक्षी राऊत यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे.
कमी विद्यार्थी संख्येची परीक्षा केंद्रे बंद होणार
पुणे विभागातील इयत्ता दहावीच्या 53 तर बारावीच्या 30 अशा एकूण 83 परीक्षा केंद्रातील विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने राज्य मंडळाच्या केंद्रनिश्चिती धोरणांच्या अटी व शर्तीचा भंग झाला आहे. या प्रकरणी माध्मिक शिक्षणाधिकारी, परीक्षा केंद्राच्या मुख्याध्यापकांच्या सुनावण्याही घेण्यात येत आहे. सुनावण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमात बसत नसलेली काही परीक्षा केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पुणे विभागातील जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांचा तपशील
जिल्हा दहावीसाठी केंद्र बारावीसाठी केंद्र
पुणे 280 190
अहमदनगर 179 108
सोलापूर 176 114
एकूण 635 412





