आरोपींच्या वकिलांकडून सरकारी वकिलाला मारहाण; पवित्र न्यायालयातच वकिलांकडून गुन्हेगारीवृत्तीचे दर्शन

वडगाव मावळ – खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदार तपासणी प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायदान कक्षात सरकारी वकिलाला आरोपींच्या तीन वकिलांनी शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना वडगाव मावळ न्यायालयात घडली. या घटनेने खळबळ उडाली.
प्रेमकुमार सुंदरलाल अगरवाल (वय 50, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर फिर्याद दिली. ऍड. विपुल दुशिंग, ऍड. सौरभ दाभाडे व ऍड. रवींद्र पवार गुन्ह्यातील आरोपी वकील आहेत.
पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अतिरिक्त सत्र न्यायालय या खटल्यात सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायालय वडगाव मावळ येथे न्यायदान कक्षामध्ये फिर्यादी सरकारी वकील हे गुन्ह्यातील मुद्देमालाशिवाय साक्षीदार तपासणीस तयार नसल्याने आरोपींच्या वकिलांच्या सोयीप्रमाणे बेकायदेशीर क्रियारीत अवलंबित नसल्याने आरोपींच्या वकिलांनी मनात राग धरून सरकारी वकिलाला न्यायदान कक्षातच अर्वाच्य शिवीगाळ करून मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार नवीनच झालेल्या अतिरिक्त सत्र न्यायालयात घडलेला आहे. झालेल्या प्रकारामुळे वकील न्यायालयीन कर्मचारी व पक्षकारांमध्ये खळबळ उडाली. सदरबाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
वकील हा समाजातील उच्च शिक्षित वर्गात मोडणारा महत्त्वाचा घटक असून सर्वसामान्य लोकांच्या कायद्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात. परंतु ज्या न्यायदान कक्षात न्यायनिवडा केला जातो. त्या पवित्र न्यायालयातच वकिलांकडून गुन्हेगारीवृत्तीचे दर्शन घडले. सर्वसामान्य लोकांनी कोणाकडून न्याय घ्यावा.





