नवी दिल्ली – भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित एका औपचारिक समारंभात शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदके प्रदान केली. या समारंभादरम्यान राष्ट्रपतींची 3 तटरक्षक पदके (उल्लेखनीय सेवा), तटरक्षक दलासाठीची आठ शौर्य पदके आणि तटरक्षक दलासाठीची गुणवत्तापूर्ण सेवेसाठीची 10 पदकांसह एकूण 21 पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांची अत्यंत निस्वार्थी समर्पित वृत्ती, अनुकरणीय साहस आणि अत्यंत कठीण परिस्थितीत दाखवलेले शौर्य याचा गौरव म्हणून ही पदके प्रदान करून या जवानांना सन्मानित करण्यात आले. राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना पदक प्राप्त जवानांना शुभेच्छा दिल्या तसेच हे पुरस्कार आणि पदके ही विजेत्यांचे मनोबल तर वाढवतीलच, मात्र देशहिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम कार्य करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या अन्य जवानांना प्रेरणा देतील असा विश्वास व्यक्त केला. सागरी सीमांचे आणि देशाच्या विशाल किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. केवळ 4-6 बोटींसह राष्ट्रसेवा सुरु करणारे भारतीय तटरक्षक दल आता 150 हून अधिक जहाजे आणि 66 विमानांसह जगातील सर्वोत्तम सागरी दलांपैकी एक आहे. संभाव्य समृद्धीसह ,समुद्रानेही विविध सुरक्षा आव्हाने उभी केली आहेत याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधले. भारत एक वाढते सागरी सामर्थ्य असून त्याची समृद्धी मुख्यत्वे समुद्रावर अवलंबून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सागर’ म्हणजेच ‘प्रदेशातील सर्वांची सुरक्षा आणि विकास ‘ या दृष्टिकोनाचा संदर्भ देत त्यांनी भारतीय तटरक्षक दल प्रादेशिक सहकार्याला प्रोत्साहन देऊन, हिंद महासागर प्रदेशात सागरी शांतता राखण्यासाठी आणि कार्य करत उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आघाडीवर असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. सागरी सुरक्षेचे उद्दिष्ट साध्य करण्यात आघाडीवर असलेल्या आणि त्यादृष्टीने आंतरराष्ट्रीय सागरी संस्थांशी समन्वय साधल्याबद्दल त्यांनी भारतीय तटरक्षक दलाचे कौतुक केले.