Anura Kumara Dissanayake : भारताबरोबरचा संरक्षण करार लवकरच संसदेमध्ये सादर करणार; दिसानायके यांनी केले स्पष्ट

कोलंबो : भारताबरोबर करण्यात येणाऱ्या संरक्षण कराराला संसदेची मंजूरी मिळण्यासाठी या कराराचे विधेयक श्रीलंकेच्या संसदेमध्ये लवकरच सादर करण्यात येणार आहे, असे श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ ते ६ एप्रिल दरम्यान श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना श्रीलंका सरकारने भारतासोबत गुप्त संरक्षण करार केला होता आणि हा करार उघड करण्याची मागणी विरोधक करत आहेत, या टीकेला ते उत्तर देत होते. या कराराबाबत विरोधक अपप्रचार करत आहेत. हा करार दोन देशांमध्ये आहे.
श्रीलंकेच्या संरक्षणासाठीच हा करार करण्यात आला आहे. हा करार दोन्ही देशांमध्ये सर्वांना माहिती घेण्यासाठी उपलब्ध आहे. शेजाऱ्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता धोक्यात येतील, अशा प्रकारे श्रीलंकेच्या भूमीचा वापर कोणत्याही भारतविरोधी कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही. ही श्रीलंकेची भूमिका दिसानायके यांनी कायम ठेवली. संसदेत मंजूरीसाठी मांडल्यानंतर त्यातील तपशील सर्वांना माहिती होणारच आहे, असे दिसानायके म्हणाले.





