पुणे | मसापच्या पदाधिकाऱ्यांची सोशल मीडियावर बदनामी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची समाजमाध्यमांवर बदनामी केल्याच्या आरोपावरून परिषदेच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बराच गदारोळ झाला.
ही पोस्ट लिहिणारे विजय शेंडगे यांचे परिषदेचे सभासदत्व सभा संपेपर्यंत रद्द करून त्यांना सभेतून बाहेर जाण्यास सांगितले. ते सभागृहाबाहेरच जाताच सभा सुरळीत झाली. मात्र, पदाधिकाऱ्यांनी शेंडगे यांच्या लिखाणाची बाब निषेधार्ह असल्याचे आपल्या भाषणात अधोरेखित केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या वेळी परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.
अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांमध्ये शेंडगे यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेले पत्र कुलकर्णी यांनी वाचून दाखविले.
शेंडगे यांची भाषा आक्षेपार्ह असून, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासह त्यांचे सभासदत्वही रद्द करण्याची मागणी कार्यवाह अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर आणि ज्योत्स्ना चांदगुडे यांनी केली. त्यानंतर सभासदांनीही सभासदत्व रद्द करण्याची मागणी केली.
लेखनाचा निषेध करणारे डॉ. न. म. जोशी, अॅड. चंद्रकांत बेबले यांचे पत्रही वाचण्यात आले. त्यानंतर जागेवरुनच आपली बाजू मांडण्यासाठी शेंडगे यांना दोन मिनिटांचा कालावधी दिला. मात्र, व्यासपीठावरुन बोलण्याची शेंडगे यांची मागणी फेटाळली.
त्या वेळी जागेवरूनच बाजू मांडण्यास शेंडगे यांनी नकार दिला. आपले सभासदत्व तात्पुरते रद्द केले असून, सभेतून बाहेर पडावे, अशी सूचना कुलकर्णी यांनी शेंडगे यांना केली.
सदस्यांच्या प्रतिक्रिया
– डॉ. रावसाहेब कसबे – राजकीय पक्षाच्या हातात परिषद जाऊ देणार नाही.
– प्रा. मिलिंद जोशी – साहित्य परिषद लोकाभिमुख आणि साहित्याभिमुख होत आहे. यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. यामुळे परिषदेची बदनामी करण्यात येत असून, त्यांचा बोलावता धनी वेगळा आहे.
– विजय शेंडगे – माझे समाज माध्यमांवरील लेखन ही साहित्य परिषदेच्या घटनाबाह्य कामकाजाच्या विरोधातील उद्विग्नता होती.




