राहुल गांधींविरुद्ध मानहानीचा खटला; कोर्टात ७ जूनला सुनावणी
Updated On:

सुलतानपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा एक खटला दाखल आहे. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी उत्तरप्रदेशातील न्यायालयाने ७ जून हा दिवस निश्चित केला. राहुल यांनी २०१८ या वर्षी बंगळुरूमधील पत्रकार परिषदेत विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती.
त्यावेळी राहुल यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप भाजपचे नेते विजय मिश्रा यांनी केला. त्यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये उत्तरप्रदेशच्या सुलतानपूरमध्ये राहुल यांच्या विरोधात मानहानीची तक्रार दाखल केली.
त्या प्रकरणी न्यायालयाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये राहुल यांच्या विरोधात वॉरंट जारी केले. त्या काळात राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होती. यात्रा थांबवून राहुल न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.





