अहमदनगर | रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचे व्यावसायिकांकडून विद्रुपीकरण

पारनेर – पारनेर शहरासह तालुक्यातील सर्व गावांमधील रस्त्याच्या कडेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणात आंबा, चिंच, वड, पिंपळ, सिसम या सारखे अनेक विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली आहेत.
पारनेर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थाचालक, खासगी संस्थाचालक, विविध इन्स्टिट्यूट, इंजिनिअरिंग कॉलेज व व्यावसायिक जाहिरातीसाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचा वापर करत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. व्यावसायिक या मोठमोठ्याल्या झाडांना खिळे, तार वापरत असल्याने झाडांना कालांतराने हानी पोहचत आहे. या व्यावसायिकांना दंड आकारण्याची मागणी पारनेर तालुक्यातील सजग नागरिक करत आहेत.
तालुक्यातील पारनेर, सुपा, भाळवणी वाडेगव्हाण, निघोज, टाकळी ढोकेश्वर आणि राळेगणसिद्धी,या गावांमध्ये रस्त्याच्या दुतर्फा प्रशासना कडून वड, पिंपळ, सिसम, निलगिरी, आंबा, चिंच तसेच विविध प्रकारचे झाडे लावण्यात आली आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या मधोमध खोडावर व्यावसायिक जाहिरातीसाठी वापर करत आहेत. जाहिरातीसाठी या झाडांवर खिळे, तार,वायरचा सर्रास वापर करत असल्याने या झाडांना कालांतराने हानी पोहचत आहे.
व्यावसायिकांनी या झाडाला जाहिराती जोडण्याचा अवलंब केला आहे. अनेकदा पोस्टर आणि स्टिकर खिळे ठोकून त्यांच्या व्यवसायांचा प्रचार करण्यासाठी या प्रथे मूळे झाडांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहचत आहे. यात फक्त हानीच पोहचत नाही तर शहर सौंदर्याचे आकर्षणही बिघडते. खिळे ठोकणे, पोस्टर लावणे, स्टिकर चिटकवणे, या सारखे प्रकार आढळल्यास महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा १९९५ अंतर्गत जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल होऊ शकतो.
पारनेर तालुक्यातील बहुतांश गावातील दुतर्फा रस्त्यावरील मोठ्या झाडांवर व्यावसायिकांकडून फ्लेक्स लावले जात आहे. वास्तविक मानवी शरीर संस्था ज्या प्रमाणे आहे, त्याप्रमाणे वनस्पती संस्थेमध्ये अन्न व पाणी वाहून नेण्यासाठी विविध वाहिन्या असतात. ज्यावेळी बॅनर लावण्यासाठी त्या झाडाला गज किंवा खिळे अडकवले जातात, त्यामुळे झाडाला अन्न पुरवठा करणाऱ्या शिरा तुटल्या जाऊन झाड सुकून जाण्याचे प्रकार घडतात. झाडाला फ्लेक्स लावण्यासाठी जो तंगुस किंवा तार वापरली जाते. ती पक्ष्यांसाठी घातक असून अनेक पक्षी यामुळे दगावले आहेत. व्यावसायिक स्वतःच्या तुटपुंज्या फायद्यासाठी निसर्गाचा ऱ्हास एक प्रकारे करत आहेत, हे कुठे तरी थांबले पाहिजे.
– प्रा.तुषार ठुबे, वृक्षमित्र.





