Alandi : फुलगाव येथील श्री शैनेश्वर मंदिरात दीपोत्सव
Alandi : या नेत्रदीपक सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय, प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

आळंदी : दिवाळी पाडव्याच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून फुलगाव येथील श्री शनैश्वर मंदिरामध्ये शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दीपोत्सवात हजारो पणत्या प्रज्वलित करून संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने उजळून निघाला. या नेत्रदीपक सोहळ्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय, प्रसन्न आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मंदिर परिसरातील विविध ठिकाणी आकर्षक पद्धतीने पणत्यांची मांडणी करण्यात आली होती. हजारो पणत्यांच्या प्रकाशामुळे मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर, भक्तिमय वातावरण आणि दीपोत्सवाचे मनमोहक दृश्य उपस्थित भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. या प्रकाशमय सोहळ्यामुळे दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणित झाला.
श्री शनैश्वर महाराजांच्या चरणी दीपप्रज्वलन करून सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यातील दुष्काळ भागात बळीराजावर आलेले संकट, अडचणी दूर होऊन सर्वत्र सकारात्मकता निर्माण व्हावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
श्री शनैश्वर मंदिर हे परिसरातील अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असून, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याच्या दृष्टीने अशा उत्सवांना विशेष महत्त्व आहे. शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवामुळे फुलगाव परिसरात दिवाळीचा उत्साह अधिकच वाढला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळलेले श्री शनैश्वर मंदिर आणि भक्तिमय वातावरण यामुळे हा दीपोत्सव उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
यावेळी उपशहर प्रमुख विशाल तापकीर, ज्ञानेश्वर घुंडरे, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शामतात्या कोळपकर, सुयश कदम, हिरामण तळेकर, स्वराज चव्हाण, पृथ्वीराज गावडे, संतोष शेवाळे, शांभवी चव्हाण आदी शिवसैनिक दीपोत्सवामध्ये सहभागी झाले होते.





