पुणे | दीपक मानकरही नाराज, पण दादांसोबत राहणार!

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांची नियुक्ती झाली नाही. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सामूहिक राजीनामे दिले.
त्यानंतर बुधवारी मानकर यांनीही येत्या शनिवारपर्यंत शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. पण, “राजीनामा दिला तरी मी अजितदादांबरोबर कार्यकर्ता म्हणून असेल,’ असे मानकर यांनी स्पष्ट केले.
“राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कोट्यातून दोन जणांची नावे जाहीर झाली होती. तत्पूर्वी शहराध्यक्षपदाची जबाबदारी मला दिल्यानंतर राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेची एक जागा पुणे शहराला मिळावी, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे केली होती. त्याबाबत त्यांनी शब्दही दिला.
मात्र, दोन्ही नावे दुसऱ्याच जिल्ह्यातील असून, पुण्याला एक जागा मिळाली असती तर कार्यकर्त्यांची ताकद वाढली असती,’ असे सांगत मानकर यांनी थेट पक्षाला “मी मेरिटमध्ये कुठे कमी पडलो? मला उमेदवारी नाकारण्याचे कारण काय?’ असा प्रश्न उपस्थित केला.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्या तत्परतेने महिला आयोग अध्यक्षांचे नाव जाहीर केले. तीच तत्परता आमच्याविषयी का नाही? भुजबळांच्याच घरात सगळी पदे द्यायची तर कार्यकर्त्यांची ताकद कधी वाढणार? आम्हाला पद का देऊ शकत नाही, हे तरी सांगावे,’ असे मानकर म्हणाले.
शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात मी लढतोय. पक्षाकडून कधीही रुपयाची मदत घेत नाही. मला इतरांसारखे पुढे-पुढे करता येत नाही.
प्रामाणिकपणे पक्ष संघटना वाढविणे आणि मजबुत करण्याचे काम केले. तरी हा अन्याय का? पुणे लोकसभेत राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली. आता विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून काम करताना आमची ताकद लक्षात येईल. दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी





