Satara | खंडाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

खंडाळा {प्रतिनिधी} : अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाबाबत खंडाळा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे खंडाळा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर संततधार पाऊस सुरू असून बरीचशी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, जेणेकरून ओल्या दुष्काळाच्या संकटातून सावरण्याची संधी शेतकरी वर्गाला मिळेल.
यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे वाई विधानसभा अध्यक्ष नितीन सावंत व कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आली.
यावेळी खंडाळा तहसीलदार अजित पाटील यांच्याद्वारे पिकांच्या नुकसानीबाबत तसेच शेतकऱ्यांच्या समस्या निराकारणाबाबत प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असून शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत योग्य ती दखल घेऊ असे सांगण्यात आले.
नितीनकाकांना राज्यसभेवर खासदारकीची संधी मिळाल्याने सत्ताधारी जल्लोष करण्यात व्यस्त असल्याने त्यांचे सर्वसामान्य शेतकरी व त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष असल्याचेही यावेळी तुतारीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.





