‘कोयना’ दरवाजे उघडण्याचा निर्णय २४ तास लांबणीवर; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी

कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर सध्या कमी झाला आहे. पाऊस कमी झाल्यामुळे धरणात येणार्या पाण्याची आवकही मंदावली आहे. सध्या धरणात 71.40 टीएमसी (67.84 टक्के ) इतका पाणीसाठा आहे. जोर कमी झाल्यामुळे हवामान विभागाने ‘ग्रीन अलर्ट’ (सर्वसाधारण पाऊस) जारी केला आहे.
कोयना धरणातील पाणी पातळीने ‘क्रश लेव्हल’ ओलांडल्यानंतर दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र, सध्या ती स्थिती नाही. पाणलोट क्षेत्रातीलरा पाऊस, धरणात येणारी आवक आणि जलपातळीचा वेग यांचे बारकाईने विश्लेषण करूनच कोयना प्रकल्प प्रशासनाने दरवाजे उघडण्याचा निर्णय पुढील 24 तासांसाठी लांबणीवर टाकला आहे.
कोयना धरणात सध्या प्रतीदिवस पाण्याची आवक 12 हजार 389 क्यूसेक म्हणजेच 1.07 टीएमसी एवढी आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पाणलोट क्षेत्रात कोयना 12 (2118), नवजा 7 (1898) आणि महाबळेश्वर 13 मिलिमीटर (1974 मिलिमीटर) एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
जलसाठ्याला क्रश पातळी गाठायला पुढील 48 तास लागले तरी शासनाने दिलेल्या धरण परिचालन सूचीप्रमाणे जलपातळी नियंत्रित करण्यासाठी दरवाजे उघडावे लागतील. दरवाजे उघडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जाणार असून प्रशासनाची सर्व यंत्रणा पूर्ण सज्ज आहे.
– अभय काटकर (अधीक्षक अभियंता, कोयना प्रकल्प)





