अरुण गवळीच्या सुटकेबाबतच्या निर्णयाला स्थगिती

नागपूर – अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ डॅडी यांच्या सुटकेबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. राज्य शासनाच्या गृह विभागाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायायात न्या. अरविंद कुमार आणि न्या. संदीप मेहता यांच्या अवकाशकालीन खंडपीठाने पुढील आदेश पर्यंत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.
अरुण गवळी याला हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. नागपूरमधील मध्यवर्ती कारागृहात गवळी बंदिस्त आहे. २००६ मधील शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षेत सुट देण्यासाठी गवळी याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात राज्य शासनाला चार आठवड्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. राज्य शासनाने याबाबत दिलेल्या कालावधीत निर्णय घेतला नाही. ८ मे रोजी याप्रकरणी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता राजा ठाकरे यांनी युक्तिवाद केला.





