मुंबई : अनाथांच्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने काही भामटे लग्न न होणाऱ्या तरुणांना लग्नासाठी मुली उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत त्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी अशा अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. या प्रकाराची माहिती देताना ममता सिंधुताई म्हणाल्या की, माई, पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने सोशल मीडियावर खोटे अकाउंट तयार करून, त्यावर लग्नासाठी मुली आहेत अस भासवून, त्यासाठी अमुक एक रक्कमेचा उल्लेख करून आपल्या मुलांसाठी मुलगी शोधत असणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांच्या सध्या मी शोधात आहे. दुसऱ्याच्या गरजांचा फायदा उठवणारे हे जे कोणी आहेत त्यांना कशाचीही भिती का बरे वाटत नसेल? आजच्या घडीला माईंच्या कुठल्याही संस्थेत लग्नासाठी मुलीच नाहीयेत. कारण ज्या आहेत त्या आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. त्या त्यांच्या पायावर उभ्या झाल्याशिवाय संस्था त्यांना लग्नासाठी आग्रह करणारच नाही. हवालदिल पालकांचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न अजून किमान तीन वर्षे तरी संस्थेत लग्न नाही. आणि हेच आम्ही दररोज आम्हाला येणाऱ्या फोनवर सांगत असतो. अशा वेळी सुंदर मुलींचे फोटो दाखवून जर लग्नासाठी मुलगी हवी असेल तर आधी गेट पास काढा आणि त्यासाठी पंधरा हजार ऑनलाइन भरा अस सांगणारे विकृतच म्हणू नये तर काय म्हणावं. आधीच समाजातील मुलींची संख्या कमी असताना, नवऱ्या मुलासाठी मुलगी मिळत नसताना अशा हवालदिल आईबापांच्या मनस्थितीचा फायदा उचलणारे किती नीच मानसिकतेचे असतील याची कल्पना न केलेलीच बरी. म्हणूनच ही पोस्ट जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी, असे त्या म्हणाल्या.