विशेष : दिव्यांग सारथी

3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे राहण्याचा अधिकार व हक्क मिळायलाच पाहिजे. त्यासाठी दिव्यांगांसोबत अन्य नागरिकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी आजपासून सर्वांनी दिव्यांग सारथी बना. त्यांना आयुष्यात यशस्वी व सक्षम बनवा.
दिव्यांगत्व म्हणजे वातावरणातील घटक व आरोग्यदायी परिस्थिती यांच्यामधील विसंवादामुळे एखाद्या व्यक्तीला इतर मुलांप्रमाणे-व्यक्तीप्रमाणे वागताना येणारे बंधन किंवा कौशल्य विकसित नसणे होय. शारीरिक व्यंग किंवा कार्यक्षमतेतील बदल, हालचालीतील मर्यादा, चालण्यातील-बोलण्यातील दोष, कृतीमधील सहभागाच्या मर्यादा या सर्वांना अपंगत्व संबोधता येईल. अपंगत्वाला आता दिव्यांग म्हटले जाते. दिव्यांगत्वाचे एकूण 21 प्रकार आहेत. या 21 प्रकरातील मुले-व्यक्ती ओळखण्यासाठी या सर्वांचा अभ्यास करून योग्य उपचार त्यांचे पुनर्वसन या बरोबरच हे दिव्यांगत्व येऊच नये म्हणून घ्यायची काळ्जी याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पातळीवर ग्रामविकास करणे. लोकसंख्या नियंत्रण, लोकांची कार्यक्षमता वाढविणे, अन्नधान्य उत्पादन वाढविणे, दोन मुलांमध्ये कमीत कमी 5 वर्षे अंतर, नात्यामध्ये लग्न न करणे, आहाराविषयी माहिती देणारे कार्यक्रम राबविणे. स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, गरोदर मातांची काळजी घेणे. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
दिव्यांग प्रतिबंधासाठी जीवनसत्त्वाचा अभाव होऊ न देणे, लोहाच्या गोळ्या घेणे, आयोडिनचा वापर करणे, शाळेतील व अंगणवाडीतील पोषण आहार घेणे, समग्र शिक्षा अभियान, समावेशित शिक्षण व एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे कार्यक्रम खूप उपयुक्त व प्रभावी माध्यम आहे.दिव्यांग मुलांना कायद्याद्वारे हिंसा, दुरुपयोग, शोषण यापासून संरक्षण देण्यात आले आहे. या मुलांना कौटुंबिक जीवन जगण्याचा अधिकार, न्यायपालिकेचा अधिकार देण्यात आला आहे. त्यांना खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, विरंगुळ्याचे खेळ खेळण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या मुलांना सर्वसामान्य मुलांबरोबर शिक्षण घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या मुलांना 18 वर्षांपर्यंत मोफत शिक्षण तसेच व्यवसाय कार्यशाळेत शिक्षण घेण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे.
दिव्यांगत्व येऊ नये म्हणून प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने आपण दिव्यांगत्व कशाप्रकारे टाळू शकतो किंवा लवकर ओळखून त्यावर उपचार कसे करू शकतो हे फार महत्त्वाचे आहे. प्राथमिक प्रतिबंधात्मक उपायांमध्ये दिव्यांगत्व येऊच नये म्हणून उपाययोजना केल्या जातात.
दुय्यम प्रतिबंधात्मक उपयांमध्ये लहान वयात आलेल्या दिव्यांगत्वाचे दुष्परिणाम व मर्यादा कमी करणे, तसेच नवजात अर्भकाला शिग्र हस्तक्षेप उपचार पद्धतीचा अवलंब करणे, बौद्धिक विकास कार्यक्रम राबविणे उपयुक्त ठरतात. तृतीय टप्प्यात दिव्यांगत्वाच्या शारीरिक व वर्तन समस्यांची तीव्रता कमी करणे व दिव्यांग मुलांसाठी व व्यक्तींसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, संस्थांची मदत घेणे. दिव्यांगत्वामुळे येणाऱ्या परिस्थितीवर मात करणे. दिव्यांग मुलाला-व्यक्तीला परिस्थितीशी तडजोड करायला शिकविणे फार महत्त्वाचे आहे.
दिव्यांगत्व टाळण्यासाठी लग्नाच्या वेळेस नात्यातले लग्न टाळायला हवे, गुणसूत्र तपासणी जेव्हा आईच्या-वडिलांच्या घरात आधी काही इतिहास असेल तेव्हा नक्कीच करायला हवी. बाळंतपणात आईचे वजन योग्यच असावे. अडीच किलोपेक्षा कमी वजनाचे मूल जन्माला येऊ नये म्हणून उपाययोजना कराव्यात. संसर्गजन्य रोग, बाल्यावस्थेतील व आईला झालेला जंतुसंसर्ग आहारातील कमतरता, अपुऱ्या सोयी सुविधा या सर्व कारणांना आपण सरकारी योजनांची प्रभावी तसेच शिक्षणाद्वारे, प्रबोधनांद्वारे, कायद्याची कडक अंमलबजावणी करून टाळू शकतो. दोन महिन्यांचे बाळ आईकडे पाहून हसते का नाही, चार महिन्यांचे बाळ मान धरते का नाही, आठ महिन्यांचे बाळ बसते की नाही, बारा महिन्यांचे मुलं स्वतःहून उभे राहते की नाही, आई-बाबा, दादा, मामा बोलते का? आपण बोललेले त्याला समजते का? हे बघणे, निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
मुलांच्या वाढ व विकासाबाबत जागरूक राहून वजन, उंची, डोक्याचा घेर यांचे नियमित मापन व निरीक्षण व्हायला हवे. कुपोषित मुले लवकर ओळखून उपचार व्हावेत. मुलाची वाढ आधी चांगली होती, नंतर कमी झाली. उदाहरणार्थ, एक वर्षाचा असताना बोलत होता, पण आता विसरला हे स्वमग्नतेचे लक्षण आहे. मुलांची चाचणी, मोठा स्नायू, लहान स्नायू, भाषिक विकास, बौद्धिक विकास, व्यक्त भाषा, गृहण भाषा विकास यामध्ये ते कुठे आहे ते पाहून पुढील उपचार करावे लागतात. सहा वर्षांत मुलांची प्रगती या सहा क्षेत्रातील वयाप्रमाणे झाली आहे की नाही हे बघणे महत्त्वाचे आहे. परंतु दुर्दैवाने आपल्याकडे अ, आ, इ, ई व 1, 2, 3, 4 आले की सर्व आले असे पालक मानतात. या मुलांना सर्वसाधारण शाळेत शिकवावे तसेच विशेष शिक्षकांद्वारे उपचार घ्यावेत. नियमित चाचण्या करून व हस्तक्षेप उपचाराद्वारे त्यांना स्वतंत्र बनवावे.
या दिव्यांग मुलांनाही जगण्याचा इतकाच अधिकार आहे जितका सर्वसामान्यांना. तेव्हा आजपासून नव्हे आतापासूनच दिव्यांग सारथी बना. त्यांना आयुष्यात यशस्वी बनवूया, प्रगतीच्या अत्युच्य शिखरावर आपल्याबरोबर नेऊया.





