राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मुंबई येथे होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी नागरिकांनी महामार्गावरील उंच मोठे आणि वाहतुकीला अडथळे ठरणारे होर्डिंग हटविण्याची मागणी केली आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात होर्डिंगचे टॉवर उभारले आहेत. वादळी वार्यात ते धोकेदायक आहेत. सध्या वळवाचा वादळी पाऊस होत असल्याने हे होर्डिंग धोकदायक बनले आहेत. रस्त्यालगत होर्डिंग उभारल्याने वादळात ते वाहनावर पडून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. महामार्गावर उभारलेल्या या होर्डिंगचे लोखंडी खांब (पिलर), त्याचे लोखंडी सांगाडे वर्षानुवर्षे ऊन वारा पावसात उभे आहेत. त्यात त्याचे अनेक लोखंडी खांब गंजले आहेत. काही लोखंडी खांब अधांतरी आहेत. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. होर्डिंगला महामार्ग प्राधिकरण यांनी महामार्गालगत उभारण्यास परवानग्या दिल्या कशा? याचीही चौकशी होणे आवश्यक असून महामार्गावरील सर्वच होल्डिंग्सचे ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी होत आहे. नुकतीच मुंबई येथे वादळी पावसात होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. तर तीन वर्षार्ंपूर्वी इंद्रायणी नदी जवळ चिंबळी गावाच्या हद्दीत अनेक होर्डिंग वादळात कोसळून अनेकांचे घराचे दुकानाचे मोठे नुकसान झाले होते. तर काही वर्षांपूर्वी पुणे शहरात आणि किवळेतही धोकादायक होर्डिंग कोसळून अनेक निष्पांपाना आपला जीव गमवावा लागा होता. प्रशासनाने अतातरी दक्षता घ्यावी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून होर्डिंग व्यवसायाला चांगले दिवस आहेत, त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी इमारतीवर, महामार्गालगत सार्वजनिक ठिकाणच्या शेजारीच भले मोठे होर्डिंग उभारले आहेत. या होर्डिंगचे लोखंडी पिलर गंजले असून धोकेदायक झाले आहेत. काही पिलर अधांतरी उभे आहेत काही होर्डिंग एकाच पिलरवर उंच बनवले आहेत. ते धोक्याचे असल्याने त्यांची उंची कमी करणे अपेक्षित असून भविष्यात मुंबई सारखी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी प्रवासी, स्थानिक नागरिक यांची मागणी आहे.