Jamkhed News : जामखेड हादरले..! चोरीच्या संशयावरून पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच जीवघेणा हल्ला
Jamkhed News : जामखेड शहरात गुन्हेगारांचे मनोबल इतके वाढले आहे की, चोरीच्या संशयावरून पकडण्यासाठी गेलेल्या कर्तव्यदक्ष पोलिसावरच एका सराईत गुन्हेगाराने काठीने प्राणघातक हल्ला चढवला.

Jamkhed News : जामखेड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरात चोरी करत असल्याचा संशय आल्याने आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच संशयिताने प्राणघातक हल्ला चढवला. या अचानक झालेल्या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे हे गंभीर जखमी झाले आहेत. (Jamkhed News)
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड शहरात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करत असल्याचा संशय आल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे व त्यांचे सहकारी संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेले. मात्र, आरोपीने पोलिसांच्या कारवाईस विरोध करत अचानक काठीने घोळवे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात घोळवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. (Jamkhed News)
घटनेनंतर सहकाऱ्यांनी जखमी पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे यांना तात्काळ उपचारासाठी जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल येथे दाखल केले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Jamkhed News)
जामखेडमध्ये कायदा-सुव्यवस्था कोलमडली; रोहित पवारांची टीका
या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जामखेडमध्ये कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप त्यांनी केला. (Jamkhed News)
रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार, दोन दिवसांपूर्वी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या भावावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर आता संशयिताला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. (Jamkhed News)
पोलिसांवरच असे जीवघेणे हल्ले होत असतील, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचं काय? असा सवाल करत त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तींना नेमका कोणाचा पाठिंबा आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच गृह विभागाने जामखेडमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली. (Jamkhed News)
नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावरच अशा प्रकारे सरेआम प्राणघातक हल्ला झाल्याने जामखेड शहर व परिसर हादरला आहे. शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, आरोपींवर कठोर कारवाई करून प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या घटनेप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून फरार आरोपीचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. (Jamkhed News)

