EF Form : गणना पत्रक भरण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत मुदत
EF Form :

पिंपरी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २०६ पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी अद्ययावत व अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत मतदारांकडून ‘ईएफ फॉर्म’ (गणना पत्रक) भरून घेण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पूर्वी गणना पत्रकचे वाटप व स्वीकृतीची अंतिम मुदत ८ ऑगस्टपर्यंत होती. मात्र, भारत निवडणूक आयोगाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या निर्देशानुसार सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार बीएलओ यांच्यामार्फत ‘ईफ फॉर्म’चे वाटप व स्वीकृती ३० जून ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत केली जाणार आहे.
यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यासाठी २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर २०२६ असा कालावधी देण्यात आला आहे.
दावे व हरकतींवर नोटीस बजावणी आणि सुनावणीची प्रक्रिया ५ ऑगस्ट ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार असून, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
‘ईएफ फॉर्म’ भरून संबंधित बीएलओकडे अद्याप जमा केलेला नाही किंवा बीएलओशी अद्याप संपर्क झालेला नाही, अशा मतदारांनी विलंब न करता आवश्यक माहिती व कागदपत्रांसह फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी अर्चना यादव यांनी केले आहे.
मतदारांना त्यांच्या संबंधित बीएलओशी संपर्क साधण्यासाठी मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच मतदार यादीतील आपले नाव तपासण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येणार आहे.
एसआयआर मोहिमेमुळे मतदार यादीतील नोंदी अद्ययावत करण्यासोबतच पात्र मतदारांचे नाव यादीत कायम राहणे आणि मतदार यादी अधिक अचूक करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी निर्धारित मुदतीपूर्वी ‘ईएफ फॉर्म’ची प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.





