“आरटीई’ प्रवेशासाठी 23 जुलैपर्यंत मुदतवाढ

पुणे -बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठीच्या निम्म्या जागा अजूनही रिक्त आहेत. यामुळे प्रवेशासाठी पुन्हा 23 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
“आरटीई’ प्रवेशासाठी एप्रिलमध्ये ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली. करोनामुळे प्रवेश प्रक्रिया थांबवली होती. गेल्या महिन्यापासून ती पुन्हा सुरू करण्यात आली. पालकांनी अद्यापही शाळांमध्ये जाऊन प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवली आहे.
राज्यात 9 हजार 432 शाळा असून यात 96 हजार 684 प्रवेशाच्या जागा आहेत. यासाठी 2 लाख 22 हजार 584 ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. त्यातील 82 हजार 129 बालकांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे. लॉटरी लागलेल्यापैकी 42 हजार 318 बालकांचे शाळांमध्ये तात्पुरते प्रवेश झाले आहेत. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करून 45 हजार 701 जणांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
करोनामुळे प्रवेशासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी पालकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे बऱ्याचशा पालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाच्या स्तरावरून सतत मुदतवाढ द्यावी लागत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील बालकांना संधी मिळणार आहे.





